Animal Evolution | पृथ्वीवर प्राण्यांचा उदय अनुमानापेक्षा २० कोटी वर्षे आधीच?

Animal Evolution |
Animal Evolution | पृथ्वीवर प्राण्यांचा उदय अनुमानापेक्षा २० कोटी वर्षे आधीच?
Published on: 
Updated on: 

लंडन : पृथ्वीवर प्राण्यांची उत्क्रांती नेमकी कधी झाली, याबद्दल वैज्ञानिक जगतात नेहमीच उत्सुकता आणि संशोधन सुरू असते. एका नवीन अभ्यासाने या संदर्भातील जुने सर्व सिद्धांत मोडीत काढणारा एक धक्कादायक दावा केला आहे. या अभ्यासानुसार, पृथ्वीवर प्राण्यांचा उदय यापूर्वी शास्त्रज्ञांनी लावलेल्या अंदाजापेक्षा तब्बल २० कोटी वर्षे आधीच झालेला असावा.

एका वैज्ञानिक अहवालानुसार, प्राचीन खडक आणि जीवाश्मांच्या नवीन विश्लेषणावरून संशोधकांना असे पुरावे मिळाले आहेत की, बहुपेशीय जीव आणि प्राण्यांचे सुरुवातीचे पूर्वज पृथ्वीवर पूर्वी मानल्या गेलेल्या कालावधीपेक्षा खूप आधीपासून अस्तित्वात होते. यापूर्वीच्या वैज्ञानिक सिद्धांतांनुसार पृथ्वीवरील प्राण्यांचा विकास एका विशिष्ट भूगर्भीय काळात झाल्याचे मानले जात होते; मात्र या नव्या शोधामुळे प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या सुरुवातीची टाईमलाईन पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संशोधनात शास्त्रज्ञांनी प्राचीन खडकांमध्ये आढळणाऱ्या विशिष्ट रासायनिक जैविक संकेतकांचा (Chemical Biomarkers) अभ्यास केला.

यापूर्वी ५३ ते ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या ‘कॅम्ब्रियन एक्सप्लोजन या काळात पृथ्वीवर प्राण्यांचा जलद गतीने विकास आणि विस्तार झाला, असा सर्वमान्य सिद्धांत होता; मात्र या नवीन अभ्यासाने प्राण्यांच्या अस्तित्वाचा हा काळ थेट ७५ ते ८० कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडात ढकलला आहे. संशोधकांनी अतिप्राचीन खडकांच्या नमुन्यांमध्ये ‘स्टेरॉईड्स’ आणि स्पंजसारख्या साध्या प्राण्यांद्वारे तयार होणाऱ्या विशिष्ट रेणूंचे अवशेष शोधून काढले आहेत. हे रासायनिक अवशेष केवळ प्राण्यांच्या शरीरातच तयार होऊ शकतात, ज्यामुळे अत्यंत प्राथमिक स्वरूपातील सूक्ष्म प्राणी किंवा स्पंजसारखे जीव पूर्वी मानल्या गेलेल्या काळाच्या कित्येक कोटी वर्षे आधी महासागरांमध्ये अस्तित्वात होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या नव्या शोधाने पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण आणि जीवसृष्टीचा विकास यांमधील संबंधांवरही नवीन प्रकाश टाकला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news