लंडन : चार्ल्स डार्विन यांनी मानव वंशाबाबत महत्त्वाचे संशोधन केलेले आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जगाला देणार्या डार्विन यांना विज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही (यामध्ये पशू, पक्षी, कीटक वगैरेंचा समावेश होतो.) जाणिवा असतात, या डार्विनने मांडलेल्या संकल्पनेला प्रदीर्घ काळ नाकारण्यात आलं होतं; पण यापुढे असे होणार नाही. कारण, वैज्ञानिकांनी जे संशोधन केलं आहे त्यावरून डार्विनने मांडलेल्या सिद्धांताला दुजोरा मिळतो. यासंदर्भात डार्विननं लिहून ठेवलं आहे की, 'सुख आणि वेदना, आनंद आणि दु:ख या गोष्टी अनुभवण्याच्या मनुष्य आणि प्राणी यांच्या क्षमतेत कोणताही मूलभूत फरक नाही.'
डार्विनला विज्ञान विश्वात खूप वरचं स्थान असलं, तरी डार्विनने मांडलेल्या सर्वच संकल्पनांना वैज्ञानिकांनी काही सहज मान्य केलं नव्हतं. प्राणी विचार करतात आणि ते अनुभव घेऊ शकतात, ही संकल्पना डार्विनने मांडली होती; पण त्याची पाठराखण मात्र कुणीच केली नव्हती. उलट डार्विनची संकल्पना विरोधाभासी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. प्राणी जो प्रतिसाद देतात त्या आधारावर त्यांच्यामध्ये जाणिवा असतात, असं मानणेदेखील चूक समजले जायचे. यासंदर्भात बरेच युक्तिवाद झाले.
मानवामध्ये जे गुण, भावना असतात, मानवाचं जे वर्तन असतं तसंच ते प्राण्यांमध्येदेखील असतं, असं मानण्यास कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नाही, तर प्राण्यांच्या मनात काय चालतं हे तपासण्याचा कोणताही मार्ग नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, आता प्राण्यांमध्ये भावना असतात आणि आजूबाजूला काय चाललं आहे यासंदर्भात प्रक्रिया करण्याच्या त्यांच्या क्षमतेचे नवीन पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे याचा अर्थ प्राण्यांमध्ये जाणिवा किंवा देहभान असते, असा होऊ शकतो का? आता आपल्याला माहिती आहे की, मधमाश्यांकडे मोजण्याचे कौशल्य असते. त्या मानवी चेहरे ओळखू शकतात आणि वस्तूंचा वापर करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे असते. लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील प्राध्यापक लार्स चिटका यांनी मधमाश्यांच्या बुद्धिमत्तेशी संबंधित संशोधन केले आहे.
यावर त्याचं मतं असं आहे की, 'जर मधमाश्या खरंच इतक्या बुद्धिमान असतील, तर त्या कदाचित विचार करू शकतात आणि त्यांना भावना असू शकतात. याच गोष्टी जाणीव निर्माण करणार्या मुख्य घटक मानल्या जातात.' प्राध्यापक चिटका यांच्या प्रयोगातून असं दिसून आलं की, एखाद्या अत्यंत क्लेशदायक घटनेनंतर मधमाश्यांच्या वर्तनात बदल घडतात. मधमाश्या छोटी लाकडी गोळी फिरवून खेळू शकतात. त्यांच्या मते, आनंद लुटण्याचा भाग म्हणून मधमाश्या या प्रकारची कृती करत होत्या. या निष्कर्षांमुळे प्राणिशास्त्रात नावाजलेल्या संशोधकांनी एक मोठं विधान केलं आहे. 'सध्या समोर असलेले पुरावे पाहता मधमाश्यांना देहभान असण्याची दाट शक्यता आहे,' असं ते म्हणाले. हे फक्त मधमाश्यांच्या बाबतीच नाही; तर साप, ऑक्टोपस, खेकडे आणि अगदी फळांवरील माश्यांनादेखील ही बाब लागू होते.