Dinosaur Fossil Feces | डायनासोरच्या जीवाश्म विष्ठेत आढळली प्राचीन पक्ष्‍यांची पिसे

पक्षी नामशेष होण्याचे गूढ उलगडणार
Dinosaur Fossil Feces |
Dinosaur Fossil Feces | डायनासोरच्या जीवाश्म विष्ठेत आढळली प्राचीन पक्ष्‍यांची पिसे
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : डायनासोरच्या जीवाश्म झालेल्या विष्ठेत (कॉपोलाईट) प्रथमच अतिशय चांगल्या अवस्थेत जतन झालेली पिसे सापडली आहेत. या पिसांमुळे सुमारे ६ कोटी ६० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राचीन पक्ष्यांचे जीवन आणि त्यातील काही प्रजाती डायनासोरांच्या अंतानंतर का टिकू शकल्या नाहीत, याबाबत नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अमेरिकेतील मॉन्टाना राज्यातील हेल क्रीक फॉर्मेशन येथे २०१६ मध्ये हे जीवाश्म आढळले. मांसाहारी डायनासोराने खाल्लेल्या पक्ष्याचे अवशेष त्यात असण्याची शक्यता आहे. जीवाश्माच्या बाहेरील भागावर झालेल्या एका नैसर्गिक भेगेमुळे एक पिसारा स्पष्टपणे दिसला. त्यानंतर संशोधकांनी मायक्रो-सीटी स्कॅनच्या मदतीने त्याच्या आतील भागाची त्रिमितीय प्रतिमा तयार केली. स्कॅनमध्ये आणखी काही पिसे, पक्ष्यांची हाडे आणि माशांचे खवले आढळले. यावरून हा पक्षी पाण्यात राहणाऱ्या हेस्पेरॉर्निथिफॉर्म्स या प्राचीन पक्षीसमूहातील असावा, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. माशांचे खवले त्याच्या शेवटच्या भोजनाचे अवशेष असण्याची शक्यता आहे.

पिसांची रचना काय सांगते?

काही पिसांमध्ये दाट आणि बारीक तंतू आढळले. त्यामुळे ही पिसे पाण्याला दूर ठेवण्यास मदत करत असावीत, अशी शक्यता आहे. काही पिसांच्या मधल्या दांड्यात अतिशय बारीक हवेच्या पोकळ्या होत्या. आधुनिक पक्ष्यांमध्ये अशी रचना पिसे हलकी आणि तरीही मजबूत ठेवण्यास मदत करते; मात्र काही पिसे आधुनिक पक्ष्यांच्या पिसांपेक्षा अधिक साधी आणि तंतूसारखी होती. त्यामुळे शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्याची त्यांची क्षमता कमी असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यानंतर वातावरणात मोठे बदल झाले आणि दीर्घकाळ थंडी निर्माण झाली. थंडीचा सामना करण्यासाठी शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता महत्त्वाची ठरली असावी. त्यामुळे हेस्पेरॉर्निथिफॉर्म्स आणि त्यांच्या जवळच्या काही प्रजाती नामशेष झाल्या असाव्यात, अशी शक्यता संशोधकांनी मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news