

लंडन : भूक आपल्या मेंदूवर अनेक प्रकारे परिणाम करू शकते. संशोधनामधून दिसून आले आहे की भूकेमुळे आपल्या भावना आणि मेंदूवर कमी कालावधीसाठी का असेना, वाईट परिणाम होतो. भुकेला नकारात्मक भावना आणि खराब मूडचे एक विश्वसनीय कारणही मानले जाऊ शकते. भावना या आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर गंभीर परिणाम करतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
नेदरलँडमधील ग्रोनिंगन युनिव्हर्सिटीतील मनोवैज्ञानिक निएनके जोंकर आणि त्यांच्या सहकार्यांनी याबाबत 129 महिलांवर अध्ययन केले. त्यापैकी निम्म्या महिलांना चौदा तास भूकेले ठेवण्यात आले. त्या सर्वांना त्यांच्या भुकेचा स्तर, खाण्याच्या सवयी आणि मूडबाबत विचारण्यात आले. ज्या महिलांना भुकेले ठेवले होते, त्यांच्यामध्ये अधिक नकारात्मक भावना, डिप्रेशन, तणाव, थकवा आणि भ्रम आढळून आला. खराब मूड नेहमी आपल्याला निराशावादी बनून जगाबाबतचा द़ृष्टिकोन बदलून टाकतो.
आपला मूड खराब असेल तर आपण नकारात्मक गोष्टीच अधिक लक्षात ठेवतो. मूड खराब होण्यामागे तुमचे रिकामे पोटही जबाबदार असते, असे संशोधकांनी सांगितले. त्यांनी सल्ला दिला आहे की योग्य वेळी आहार घेणे गरजेचे आहे. जे खाल त्याचा आनंद घेत खावे. जेवत असताना मन विचलित होऊ देऊ नये. कुटुंब किंवा मित्रमंडळींसमवेत खाल्ल्याने जेवणाचा आनंद वाढतो. दूध, भाज्या, फळे यांचा समावेश जेवणात असावा. अन्न नेहमी ताजे व घरचे असावे.