Amazon Rainforest: पुढील १०० वर्षांत नष्ट होणार अ‍ॅमेझॉन?

‘जगाचे फुफ्फुस’ धोक्यात; शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा!
Amazon Rainforest
Amazon Rainforest
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अ‍ॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. सुमारे ५२ लाख चौरस किलोमीटर (२० लाख चौरस मैल) क्षेत्रात पसरलेले हे जंगल अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यापेक्षा १२ पटीने मोठे आहे. जागतिक जलचक्राचे नियंत्रण करणे, अब्जावधी टन कार्बन साठवून ठेवणे, सुमारे ४ कोटी ७० लाख लोकांना उपजीविका देणे आणि पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता टिकवून ठेवणे, यामध्ये अ‍ॅमेझॉनचा वाटा अमूल्य आहे. परंतु, हेच अ‍ॅमेझॉनचे जंगल आता झपाट्याने नष्ट होत आहे. या जंगलाचा १७ टक्के भाग आधीच तोडला किंवा नष्ट केला गेला असून, त्या जागी आता शेती केली जात आहे.

याशिवाय खनिज तेलाचे उत्खनन आणि बेकायदेशीर खाणकाम यांसारखे गंभीर धोके या जंगलाचे अस्तित्व हळूहळू संपवत आहेत. पुढील शतक या जंगलासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण अ‍ॅमेझॉन आता अशा एका टप्प्यावर पोहोचू शकते, जिथून ते पूर्ववत करणे अशक्य होईल.

पुढील १०० वर्षांत अ‍ॅमेझॉनचे जंगल कसे दिसेल? याचे उत्तर तिथे निर्माण होत असलेल्या अनेक एकत्रित संकटांवर अवलंबून आहे, अशी माहिती स्पेनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सँटियागो डी कॉम्पोस्टेला’ येथील ‘इक्वलसी लॅब’चे संशोधक बर्नार्डो फ्लोरेस यांनी दिली. शेतीसाठी होणारे अतिक्रमण आणि संघटित गुन्हेगारी यांमुळे अ‍ॅमेझॉनचे जंगल आधीच आकुंचन पावत आहे. परंतु, फ्लोरेस यांच्या मते यासोबतच तीन मुख्य धोके एकत्र काम करत आहेत- १. हवामान बदल : ज्यामुळे कमालीचे विषम हवामान तयार होत आहे (अधिक तीव्र पावसाळा आणि अत्यंत कोरडा उन्हाळा). २. जंगलतोड ३. वणवे. अ‍ॅमेझॉनचे जंगल जसजसे नष्ट होत जाईल, तसतसे एक धोकादायक दुष्टचक्र सुरू होईल.

फ्लोरेस यांनी स्पष्ट केले की, ‘जंगल कमी झाल्यामुळे पाऊस कमी पडेल; पाऊस कमी पडल्यामुळे जंगल आणखी सुकेल आणि नष्ट होईल. हे चक्र शेवटी जागतिक स्तरावर परिणाम करेल: अधिक जंगलतोड म्हणजे अधिक जागतिक तापमानवाढ आणि वाढत्या तापमानवाढीमुळे जंगलाचा अधिक ऱ्हास!’ जंगले जसजशी कोरडी पडतात, तसतशी तिथे वणवे लागण्याची आणि ते पसरण्याची शक्यता वाढते. जंगलातून जाणारे रस्तेही अ‍ॅमेझॉनचा ऱ्हास करत आहेत. ‘जिथे जिथे रस्ते तयार होतात, तिथे बेकायदेशीर कारवाया आणि लाकूडतोड करणारे लोक पोहोचतात... आणि यामुळे पुढे जंगलांना वणवे लागतात,’ असे फ्लोरेस म्हणाले.

अ‍ॅमेझॉनच्या सीमेवर सुमारे ५ लाख चौरस किलोमीटरचा एक असा पट्टा आहे, ज्याला ‘आर्क ऑफ डिफॉरेस्टेशन’ (जंगलतोडीची सीमा) म्हटले जाते. हा जगातील सर्वात मोठा जंगलतोड होणारा भाग आहे. फ्लोरेस यांच्या मते, भविष्यात संपूर्ण अ‍ॅमेझॉन कसे दिसेल, याची ही एक झलक आहे. या भागात उरलेल्या जंगलांमधील झाडे मोठ्या प्रमाणावर मरत आहेत, जंगलाची घनता कमी झाली आहे आणि संपूर्ण भाग ‘लियानास’ म्हणजेच चिवट वेलींनी व्यापला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news