Famous Rooster : डोके नसतानाही तब्बल १८ महिने जिवंत राहिला हा कोंबडा! जाणून घ्या या अद्भूत रहस्यामागचे सत्य

निसर्गाच्या प्रत्येक नियमाला अपवाद ठरवणारा हा किस्सा आजही आहे एक मोठे रहस्य
Famous Rooster
Famous Rooster
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : कोणताही पशू किंवा पक्षी डोके कापल्यावर जिवंत राहील असे आपल्याला अजिबात वाटणार नाही; मात्र प्रत्येक नियमालाही अपवाद असतोच. १९४० च्या दशकात ‘माईक द हेडलेस चिकन’ अशा नावाने प्रसिद्ध झालेला एक कोंबडा डोके नसतानाही तब्बल १८ महिने जिवंत राहिला होता. जगभरात कुतूहलाचा विषय ठरलेली ही अद्भूत घटना आजही शास्त्रासाठी एक रहस्य मानली जाते.

१० सप्टेंबर १९४५ रोजी अमेरिकेच्या कॉलोराडोमधील फ्रुआटा येथे ही घटना घडली. लॉइड ओस्सेन नावाचा शेतकरी रात्रीच्या जेवणासाठी कोंबड्या कापण्याचे काम करत होता. जेव्हा त्याने एका तरुण कोंबड्यावर कुऱ्हाड चालवली, तेव्हा कुऱ्हाडीचा घाव बसूनही तो कोंबडा मेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, डोके धडावेगळे झाल्यानंतरही तो कोंबडा सामान्यपणे इकडे-तिकडे फिरू लागला आणि जमिनीवर दाणे टिपण्याचा प्रयत्न करू लागला. ओस्सेन यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी दया दाखवून त्या कोंबड्याला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ‘माईक’ असे त्याचे नाव ठेवले.

डोक्याचा मोठा भाग आणि मेंदूचा मुख्य हिस्सा कापला गेला असला, तरी कोंबड्याच्या जिवंत राहण्यामागे एक वैद्यकीय कारण होते. ओस्सेन यांनी चालवलेला कुऱ्हाडीचा वार कोंबड्याची मुख्य रक्तवाहिनी आणि मेंदूचा श्वासोच्छवास व हालचाली नियंत्रित करणारा भाग वाचवून गेला होता. कोंबड्याच्या मेंदूचा सुमारे ८० टक्के भाग आणि एक कान सुरक्षित राहिल्यामुळे त्याचे शरीर यंत्राप्रमाणे काम करत होते. सुरुवातीला लॉइड ओस्सेन यांनी माईकला खाऊ घालण्यासाठी एक लहान ड्रॉपरचा वापर केला. ते द्रवरूप अन्न आणि पाण्याचे मिश्रण थेट त्याच्या अन्ननलिकेत सोडत असत. अधूनमधून श्वासोच्छवास नलिकेत अडकलेला चिकट कफ काढण्यासाठी ते एका लहान सिरिंजने तो साफ करत असत.

काही काळानंतर माईक नावाचा हा डोके नसलेला कोंबडा अमेरिकेत एक आकर्षण बनला. ओस्सेन यांनी त्याला देशभरातील प्रदर्शनांमध्ये दाखवण्यास सुरुवात केली. लोक या अद्भु‌त कोंबड्याला पाहण्यासाठी पैसे मोजत असत. त्याच्या लोकप्रियतेच्या काळात ‘लाईफ’ आणि ‘टाइम’ सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी आणि मासिकांनी या घटनेवर प्रमुख वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या काळी माईकची किंमत तब्बल १०,००० अमेरिकन डॉलर्स एवढी लावली गेली होती, जी त्या काळात अत्यंत मोठी रक्कम मानली जात होती. मार्च १९४७ मध्ये एका रात्री एका हॉटेलमध्ये विश्रांती घेत असताना माईकच्या घशात खाण्याची अन्ननलिका अडकली. लॉइड ओस्सेन यांची ती सिरिंज आणि स्वच्छ करण्याचे साहित्य आदल्या दिवशी दुसऱ्या प्रदर्शनाच्या ठिकाणी विसरले होते. त्यामुळे त्या रात्री श्वास अडकून माईकचा मृत्यू झाला. आजही कॉलोराडोमधील फ्रुआटा येथे या अद्भु‌त कोंबड्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ‘माईक द हेडलेस चिकन डे’ साजरा केला जातो. एक अनोखी जिद्द आणि निसर्गाचा अपवादात्मक चमत्कार म्हणून ‘माईक’ची ही कथा आजही जगभरात आदराने व कुतूहलाने सांगितली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.