लंडन : आपल्या पृथ्वीसाठी सर्वात मोठा ऊर्जा स्रोत आहे सूर्य. जर सूर्यापासून मिळणार्या ऊर्जेचा आपण पूर्णपणे उपयोग करू शकलो तर सध्याची ऊर्जेची गरज सहज भागू शकते. आपल्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेत अशा अनेक सौरमालिका आहेत व अर्थातच सूर्यासारखे अनेक तारे आहेत, जे सातत्याने ऊर्जेचे ऊत्सर्जन करत आहेत; मात्र ही ऊर्जा गोळा करून साठवण्यासाठी प्रगत सामग्रीची गरज आहे. पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवसृष्टी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र कदाचित असे एलियन्स असतीलच तर त्यांनी जणू काही अंतराळातच आपला पॉवर प्लँट म्हणजे ऊर्जा प्रकल्प तयार केला असता. आता अशाच रचनेचा शोध लावण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. जणू काही एलियन्स आपल्या आकाशगंगेतील ही ऊर्जा 'चोरत' आहेत!
न्यूरल नेटवर्क एल्गोरिदमच्या सहाय्याने आकाशगंगेच्या लाखो तार्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये संशोधकांना 60 असे तारे आढळले जे एखाद्या मोठ्या एलियन पॉवर प्लँटला घेरलेले असावेत, असे वाटते. एलियन्स एका अत्याधुनिक पॉवर प्लँटचा वापर करून आकाशगंगेतील तार्यांपासून ऊर्जा चोरून नेत असावेत, अशी त्यांची रचना आहे. खगोलशास्त्रज्ञांनी अशा सात तार्यांची ओळख केली आहे ज्यांच्यामध्ये रहस्यमय ऊर्जा आहे. हे सात तारे आकाराने सूर्याच्या 60 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. त्यांच्यामधून बाहेर जाणार्या तापमानामधील वृद्धी हे संकेत देते की कदाचित त्यांच्या ऊर्जेचा वापर केला जात असावा. रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'डेली मेल'च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की सुमारे 50 लाख तार्यांमधून येणार्या डेटाला एकत्र करून संभाव्य डायसन क्षेत्रांची एक सूची बनवण्यात आली आहे.
यादरम्यान संशोधकांना आंशिक रूपाने एका विशाल एलियन संरचनेचे द़ृश्य दिसून आले, जे अत्याधिक इन्फ्रारेड विकिरणांना उत्सर्जित करू शकतात. ही संरचना मध्य इन्फ्रारेड विकिरणांच्या रूपात अपशिष्ट उष्मा उत्सर्जित करील जी संरचना पूर्ण होण्याच्या स्तराशिवाय तिच्या प्रभावी तापमानावरही निर्भर असेल. अर्थात संशोधकांना हेही वाटते की अशी ऊर्जा ब्रह्मांडात धुळीच्या कड्या आणि नेब्युलाकडूनही उत्सर्जित होऊ शकते.