वॉशिंग्टन ः जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असलेले अब्जाधीश उद्योगपती आणि 'टेस्ला', 'स्पेसएक्स'सारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क आता पुन्हा चर्चेत आले आहेत. ही चर्चा त्यांच्या एखाद्या कामाची नसून त्यांच्या 'हमशकल'मुळे सुरू झाली.
सोशल मीडियात हुबेहूब त्यांच्यासारख्याच दिसणार्या माणसाचा एक व्हिडीओ आला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे. खुद्द मस्क यांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे! मस्क यांचा हा 'जुळा भाऊ' अमेरिकेत नसून चीनमध्ये आहे!
एका व्यक्तीसारखे दिसणारे जगभरात सात व्यक्ती असू शकतात असे म्हटले जाते. आता मस्क यांना किमान एक माणूस मिळाला आहे असे म्हटले तरी चालेल! हा व्हिडीओ पाहिल्यावर कुणालाही वाटावे की हे मस्कच आहेत. मात्र, हा माणूस चीनमधील शुझोऊचा रहिवासी आहे. त्याचा व्हिडीओ आणि फोटोंनी सोशल मीडियात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या व्हिडीओला पाहिल्यावर अनेकांनी 'टेस्ला'चे सीईओ मस्क यांना त्याच्याबरोबर टॅग केले. याबाबत आता मस्क यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. मस्क यांनी म्हटले आहे की 'तेही थोडे चिनी आहेत!' या व्हिडीओत चिनी भाषेत बोलणारी एक व्यक्ती लक्झरी कारसमोर काळ्या पोशाखात उभी असलेली दिसून येते. तिचे बोलणे आणि हसणेही अगदी मस्क यांच्यासारखेच आहे.
हा माणूस खरोखरच मस्क यांच्यासारखा नसावा तर ही नेहमीसारखीच चिनी बनावटगिरी असावी असे अनेकांना वाटते. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स फेस स्वॅप टेक्नॉलॉजी'चा यासाठी वापर केला असावा असेही म्हटले जाते. या माणसाने आपल्या चेहर्याऐवजी मस्क यांचा चेहरा लावला असावा असे म्हणणार्यांची संख्याही मोठी आहे.
हेही वाचलंत का?