

वॉशिंग्टन; पृथ्वीजवळून बुधवारी अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या पुतळ्यापेक्षा तिपटीने मोठ्या आकाराचा असलेला लघुग्रह अत्यंत वेगाने पुढे गेला. '2017 एई 3' असे नाव असलेला हा लघुग्रह ताशी 75 हजार किलोमीटर वेगाने गेला. तो 353 मीटर रुंदीचा होता आणि पृथ्वीपासून सुमारे 19 लाख मैल अंतरावरून गेला.
हा लघुग्रह जरी इतक्या मोठ्या अंतरावरून गेला असला तरी वैज्ञानिकांना हे अंतरही तुलनेने कमीच वाटत आहे. त्यामुळेच या लघुग्रहाकडे सुरुवातीपासूनच 'नासा'च्या वैज्ञानिकांची नजर होती. असे वेगवान आणि मोठ्या आकाराचे लघुग्रह जर मार्ग सोडून भरकटले आणि त्यांची पृथ्वीला धडक झाली तर मोठाच विनाश घडू शकतो. अशाच एका विनाशात पृथ्वीवरून डायनासोरचे साम—ाज्य नष्ट झाले होते.
यापूर्वी दोन लघुग्रह पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेले आहेत. '2020 क्यूजी' हा लघुग्रह दक्षिण हिंदी महासागरावरून केवळ 1830 मैल अंतरावरून पुढे गेला होता. अर्थात तो इतक्या छोट्या आकाराचा होता की त्याच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. '2020 व्हीटी 4' हा लघुग्रह गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पृथ्वीपासून काही शे मैल अंतरावरून गेला होता. त्याचाही आकार अतिशय लहान होता.
'लघुग्रह' या अशा अवकाशीय शिळा असतात ज्या ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती फिरत असतात; पण त्यांचा आकार ग्रहांच्या तुलनेत अतिशय लहान असतो. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. त्याला 'अॅस्टेरॉईड बेल्ट' असे म्हटले जाते.