

सॅन फ्रान्सिस्को : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आता फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते किंवा फोटो बनवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक अशी थक्क करणारी घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडले आहे. एका प्रयोगाच्या स्वरूपात चालवल्या जाणाऱ्या ‘Andon Market’ या रिटेल स्टोअरमध्ये एआय मॅनेजरने एका मानवी कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या एआय एजंटने माणसाला कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथील Andon Market चालवणाऱ्या Andon Labs या कंपनीने खुलासा केला आहे की, त्यांच्या ‘Luna’ नावाच्या ‘एआय’ मॅनेजरने (जी Claude AI मॉडेलवर आधारित आहे) एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केले. रिपोर्टनुसार, तो कर्मचारी एकूण २३ शिफ्ट्सपैकी १७ वेळा कामावर उशिरा पोहोचला होता. याशिवाय त्याच्या कामात इतरही अनेक प्रकारचा निष्काळजीपणा दिसून येत होता. एआय बॉसने डेटा आणि नियमांचे विश्लेषण केल्यानंतर कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय सुनावला. विशेष म्हणजे एआय मॅनेजरने हा निर्णय लगेच घेतला नाही. सुरुवातीला एआय बॉस मानवी कर्मचाऱ्यांविषयी बऱ्याच मवाळ भूमिकेत होता. एआय मॅनेजरने स्वतःच हजेरीचे नियम बनवले होते; परंतु स्वतःच्या मर्यादित मेमरीमुळे तो ते विसरून गेला. कर्मचारी उशिरा आले तरी तो त्यांना निवांत काम करण्याची परवानगी देत असे.
कंपनीचे सीईओ लुकास पीटरसन यांनी सांगितले की, जर तिथे एखादा मानवी बॉस असता, तर त्याने या कर्मचाऱ्याला खूप आधीच नोकरीवरून काढून टाकले असते. एआय बॉसच्या या मवाळ भूमिकेमुळे स्टोअरला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मार्च महिन्यात स्टोअरच्या बँक खात्यात १,००,००० डॉलर्स होते, जे अवघ्या पाच महिन्यांनंतर घटून ६१,१८६ डॉलर्सवर आले. कंपनीला जेव्हा या मोठ्या नुकसानाची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी एआय मॅनेजरला त्याची जुनी अटेंडन्स पॉलिसी आठवून दिली आणि कर्मचाऱ्याच्या कामाचे पुन्हा मूल्यांकन करण्यास सांगितले. टाईम मॅगझिनच्या रिपोर्टनुसार, एआय मॅनेजरने स्वतःहून हा निर्णय घेतला नाही. जेव्हा एंडोन लॅब्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एआय बॉसला विचारले की, ‘‘हा कर्मचारी या स्टोअरसाठी योग्य आहे का?’’ तेव्हा कुठे एआयने डेटा तपासला आणि कर्मचाऱ्याला काढून टाकण्याची शिफारस केली. सुरुवातीला एआयने फक्त चेतावणी देण्याचा सल्ला दिला होता; परंतु पुढील चौकशीनंतर त्याने थेट बडतर्फीचा निर्णय घेतला.
भविष्यासाठी एक इशारा
Andon Labs चे सीईओ लुकास पीटरसन यांच्या मते, ही घटना भविष्याची एक मोठी झलक आहे. येत्या काळात जसे जसे एआय मॉडेल्स अधिक प्रगत होतील, ते माणसांचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात करतील. त्यांनी सांगितले की, एआय खूप शक्तिशाली आहे; परंतु काम करून घेण्यासाठी त्याला मानवी श्रमाची गरज भासेल. भविष्यात एआय मॉडेल्सना अधिक कठोर बनण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही मानवांसाठी चिंतेची बाब आहे. स्टोअरमध्ये काम करणाऱ्या फेलिक्स कार्सन या दुसऱ्या एका मानवी कर्मचाऱ्याने आपली खंत व्यक्त केली. रोबो किंवा एआयच्या हाताखाली काम करणे हा अतिशय विचित्र आणि भीतीदायक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.