AI Biological Weapons | जैविक शस्त्रांच्या निर्मितीसाठी ‘एआय’

AI Biological Weapons |
AI Biological Weapons | जैविक शस्त्रांच्या निर्मितीसाठी ‘एआय’
Published on
Updated on

न्‍यूयॉर्क; वृत्तसंस्था : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विस्तार जितक्या वेगाने होत आहे, तितकाच त्याच्या गैरवापराचा धोकाही वाढू लागला आहे. जैविक शस्त्रांच्या निर्मितीस मदत ठरू शकेल अशा पद्धतीचा चीन, रशिया आणि येमेनमधील घटकांनी वापर केल्याची माहिती उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.

सुमारे ३५ अत्यंत चिंताजनक संशोधन प्रयत्नामध्ये प्रत्यक्ष घडलेल्या ५ घटनांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. भौगोलिक निर्बंध टाळून आणि संशोधनाचा खरा हेतू लपवून वापरकर्त्यांनी 'क्लॉड'चा वापर केला. बर्ड फ्लूचा विषाणू सस्तन प्राण्यांमध्ये कसा पसरतो आणि तो अधिक घातक कसा बनवता येईल, यावर संशोधन केले जात होते. चिकुनगुनिया विषाणूची संसर्ग क्षमता आणि मानवी प्रतिकारशक्तीला चकवा देण्याच्या पद्धतींवर 'गेन-ऑफ-फंक्शन' अभ्यासासाठी मदत मागण्यात आली. स्मॉलपॉक्स आणि एमपॉक्ससारख्या ऑर्थोपॉक्स विषाणूंसह विविध घातक विषद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी या मॉडेलचा वापर केला गेला.

केवळ जैविक शस्त्रेच नव्हे तर चीन, रशिया आणि येमेनमधील घटकांनी पाळत ठेवणे, घोटाळे आणि ड्रोन-क्षेपणास्त्रांच्या सॉफ्टवेअर निर्मितीसाठी एआयचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. चीनमधील उईघूर अल्पसंख्याक, तिबेटी बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायांवर हेरगिरीसाठी क्लॉडचा वापर झाला. तसेच, उत्तर येमेनमधील हुती बंडखोरांशी संबंधित घटकांनी क्षेपणास्त्र मार्गदर्शन यंत्रणेसाठी एआय प्रणालीचा वापर केल्याचे उघड झाले आहे. 'डीपसीक'सारख्या कंपन्यांकडून क्लॉडकडे वापरकर्त्यांचे प्रश्न परस्पर वळवण्याचे प्रकारही समोर आले आहेत. औषधनिर्माण आणि कर्करोगासारख्या आजारांवर मात करण्यासाठी एआय अत्यंत उपयुक्त ठरत असले, तरी चुकीच्या हातांत हीच क्षमता विनाशकारी ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news