

वॉशिंग्टन : दुपारच्या वेळी घेतलेली एक छोटीशी डुलकी आपल्या सर्वांनाच प्रिय असते. दिवसभराच्या धावपळीत आणि थकव्यात हे काही क्षणांचे सुख नक्कीच आराम देते. मात्र, डॉक्टरांच्या मते तुमची ही सवय तुमच्या जीवावर बेतू शकते. हार्वर्ड विद्यापीठाच्या एका संशोधनातून असा धक्कादायक खुलासा झाला आहे की, दुपारी झोपल्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, दुपारी झोपणे पूर्णपणे वाईट नाही. मात्र, धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुम्ही ‘चुकीच्या वेळी’ किंवा ‘खूप जास्त वेळ’ झोपता. चुकीच्या पद्धतीने घेतलेली ही डुलकी शरीरासाठी एखाद्या विषाप्रमाणे काम करते आणि आरोग्याला आतून पोखरते. जर तुम्हाला दुपारी झोपायची सवय असेल आणि आजारांपासूनही लांब राहायचे असेल, तर आरोग्य तज्ज्ञांनी दोन महत्त्वाचे नियम सांगितले आहेत :
योग्य कालावधी : दुपारची डुलकी ही केवळ 10 ते 30 मिनिटांचीच असावी. यापेक्षा जास्त वेळ झोपणे आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायक ठरू शकते. योग्य वेळ : दुपारी झोपण्यासाठी सर्वात सुरक्षित वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 च्या दरम्यान आहे. दुपारी 2 नंतर चुकूनही झोपू नये. झोपेचा मुख्य भाग हा रात्रीच पूर्ण केला पाहिजे. जर तुम्हाला रात्री शांत आणि विनाअडथळा झोप हवी असेल, तर दुपारी जास्त वेळ झोपणे टाळा.