पृथ्वीनंतर आता मंगळाला धडकले सौरवादळ

पृथ्वीनंतर आता मंगळाला धडकले सौरवादळ

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने सौरवादळाबाबतची एक नवी माहिती दिली आहे. 'नासा'ने म्हटले आहे की, आता मंगळ ग्रहाला सौरवादळ धडकले आहे. हे सौरवादळ मे महिन्याच्या अखेरीस सूर्यापासून निघाले होते. आता या लाल ग्रहाला सौरवादळाने घेरले आहे. त्यामुळे तिथे ऑरोरा, भारीत कण आणि विकिरण पाहायला मिळत आहेत.

गेल्या वर्षभरापासून सूर्यावर अनेक घडामोडी घडत आहेत. सौरवादळ दर अकरा-बारा वर्षांनी आपल्या सर्वात वरच्या स्तरावर पोहोचते. त्याला 'सोलर मॅक्झिमम' असे म्हटले जाते. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी हा स्तर गाठला जाईल, असे मानले जात आहे. सूर्यापासून एक्स क्लास फ्लेअर्स निघत आहेत, ज्या अतिशय शक्तिशाली असतात. कोरोनल मास इजेक्शनमधून प्लाझ्मा उत्सर्जित होत आहे. मे महिन्यात पृथ्वीवरही सौरवादळ आले होते.

त्यामुळे भारताच्या लडाखपासून ते युरोप-अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आकाशात रंगीबेरंगी प्रकाशझोतांचा ऑरोरा दिसून आला होता. सूर्यावर सध्या अनेक सनस्पॉटस् दिसत आहेत. हा सनस्पॉट क्लस्टर पृथ्वीचा शेजारी ग्रह असलेल्या मंगळाच्या दिशेने फिरला आहे. मंगळाभोवती फिरत असलेल्या अनेक ऑर्बिटर्सनी या सौरवादळाची नोंद घेतली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news