

मास्ट्रिच : सामान्यतः हृदयाचे ठोके संथ असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. मात्र, एका नवीन आणि मोठ्या संशोधनाने या समजाला छेद दिला आहे. हृदयाचे ठोके खूप कमी किंवा खूप जास्त असणे, या दोन्ही स्थितींमुळे ‘स्ट्रोक’चा (पक्षाघात) धोका वाढू शकतो, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
नेदरलँडमधील मास्ट्रिच येथे आयोजित ‘युरोपियन स्ट्रोक ऑर्गनायझेशन कॉन्फरन्स 2026’मध्ये 6 मे रोजी हे महत्त्वपूर्ण संशोधन सादर करण्यात आले. यूके बायोबँकेमधील सुमारे 4,60,000 व्यक्तींच्या आरोग्याच्या डेटाचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यामध्ये पुढील बाबी समोर आल्या : सुरक्षित मर्यादा : ज्या व्यक्तींच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग दर मिनिटाला 60 ते 69 (लिा) दरम्यान आहे, त्यांना स्ट्रोकचा धोका सर्वात कमी असल्याचे आढळले.
उच्च हृदय गती : ज्यांचे ठोके दर मिनिटाला 90 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत, त्यांच्यामध्ये स्ट्रोकचा धोका 45 टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले. अतिशय कमी हृदय गती : धक्कादायक म्हणजे, ज्यांचे ठोके दर मिनिटाला 50 पेक्षा कमी आहेत, त्यांच्यामध्येही स्ट्रोकचा धोका 25 टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळले. इम्पेरियल कॉलेज लंडनचे क्लिनिकल फेलो आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक डॉ. डेक्स्टर पेन म्हणाले, ‘लोकांचा असा समज असतो की, हृदयाचे ठोके जितके जास्त, तितका स्ट्रोकचा धोका जास्त. परंतु, हा संबंध सरळ नसून तो ‘ U’ आकाराचा आहे. म्हणजेच मध्यम गती सुरक्षित असून, दोन्ही टोकांकडची (खूप कमी किंवा खूप जास्त) स्थिती धोकादायक आहे.’
संशोधकांनी वय, रक्तदाब आणि ‘एट्रियल फायब्रिलेशन’ (AFib - हृदयाचे अनियमित ठोके) यांसारख्या घटकांचा विचार करूनही हा धोका कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. अभ्यासाचे सहलेखक अॅलिस्टर वेब यांनी स्पष्ट केले की, ज्यांना हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा (AFib) कोणताही इतिहास नाही, त्यांच्यामध्येही हा ‘U’ आकाराचा पॅटर्न दिसून आला. त्यांच्या मते, हृदयाची विश्रांतीच्या वेळची गती भविष्यातील आरोग्याच्या धोक्याचा एक महत्त्वाचा संकेत असू शकते.