

वॉशिंग्टन : 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील जेझेरो क्रेटर या विशाल विवरामध्ये असामान्य असा पांढर्या रंगाचा दगड शोधला आहे. या लाल ग्रहावर असा दगड यापूर्वी कधीही दिसून आला नव्हता. संशोधकांनी म्हटले आहे की, या दगडाच्या अभ्यासातून मंगळाचा भूतकाळ समजून घेण्यास मदत मिळेल.
या दगडाला 'अटोको पॉईंट' असे नाव देण्यात आले आहे. हे नाव पृथ्वीवरील ग्रँड कॅनिय या अमेरिकेतील विशाल दरीत सापडलेल्या व अशाच दिसणार्या एका खडकावरून देण्यात आले आहे. मंगळावर काळ्या रंगाचे दगड आढळत असतात; पण अशा दगडांमध्ये हा पांढर्या, हलक्या रंगाचा दगड वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. 27 मे रोजी पर्सिव्हरन्स रोव्हरने टिपलेल्या छायाचित्रांमध्ये या दगडाचा छडा लागला. हा दगड सुमारे 45 सेंटिमीटर रुंद आणि 35 सेंटिमीटर उंचीचा आहे.
रोव्हरच्या 'सुपरकॅम' आणि 'मास्टकॅम-4' या कॅमेरा उपकरणांच्या सहाय्याने संशोधकांनी या दगडाचे बारकाईने निरीक्षण केले. त्यावरून हा दगड पायरॉक्सिन व फेल्डस्पारपासून बनलेला असल्याचे स्पष्ट झाले. हा दगड मंगळाच्या अन्य भागातून इथे एखाद्या प्राचीन नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून आला असावा, असे संशोधकांना वाटते. त्याची निर्मिती जमिनीखालील मॅग्मामुळे झालेली असावी व नंतर तो स्फोटातून वर आला असावा, असाही एक अंदाज आहे.