जबलपूर : जबलपूरमधील एक विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. याठिकाणी अडीच फूट उंचीच्या वधूने साडेपाच फूट उंचीच्या मुलाशी लग्न केले. दोघेही आधी शेजारी होते. नंतर त्यांच्यात स्नेह निर्माण झाला. त्यांनी विवाहही केला; पण यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.
जबलपूरमधील घाना येथील रहिवासी असलेली संध्या हिची उंची अडीच फूट आहे. तिचे लग्न 5.5 उंची असलेला तिचा प्रियकर प्रभातसोबत झाले. येथील एका समाज सेवा संघटनेच्या माध्यमातून हे लग्न यशस्वीपणे पार पडले. जबलपूर येथील हनुमानताल क्षेत्रात स्थित असलेल्या शिव मंदिरात धुमधडाक्यात हे लग्न पार पडले. प्रभातला रीवा येथील एका कंपनीत नोकरी मिळाली. तसेच संध्या एक नृत्यांगना आहे. ती विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करते.
संध्याने जेव्हा प्रभातसोबत लग्न करण्याबाबत आपल्या आईला सांगितले, तेव्हा आधी तिच्या आईने नकार दिला. आई आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पुढे संध्याने जबलपूर येथील बीएचसीएचआय संस्थेकडे धाव घेतली. या संस्थेने तिला फक्त राहायला जागाच दिली नाही तर प्रभातसोबत धुमधडाक्यात विवाहदेखील लावून दिला.