

दक्षिण कॅरोलिना : अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे एक रेस्टॉरंट चालवणारा इलियट मिडलटन आपल्या औंदार्यासाठी अधिक ओळखला जातो. गरजूंना अगदी जुन्या कार मोफत देण्यासाठी त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 38 वर्षीय इलियटचे वडील कार मेकॅनिक होते. त्यांचे अचानक निधन झाले. त्यानंतर इलियटने रेस्टॉरंट व्यवसायात बरीच मेहनत घेतली आणि तो या मेहनतीच्या बळावर अल्पावधीत नावारूपासही आला. अर्थात, याचवेळी त्याने आपल्या वडिलांच्या व्यवसायातही खंड पडू दिला नाही.
वडिलांचा व्यवसाय पुढे अव्याहतपणे सुरू ठेवत असताना इलियटने वेगळीच क्लृप्ती लढवली. तो आता जुन्या कारची दुरुस्ती करतो आणि गरजूंना अगदी मोफत वाटतो. वास्तविक, दक्षिण कॅरोलिनामध्ये वाहतुकीची मोठी समस्या आहे. त्यामुळे साहजिकच बहुतांशी नागरिकांना स्वत:चे वाहन असणे निकडीचे असते.
इलियट आता सर्वप्रथम अशा कार मालकांशी संपर्क साधतो, ज्यांच्या कार अडगळीत पडलेल्या आहेत किंवा जुन्यापुराण्या झालेल्या आहेत आणि वापरात नाहीत. इलियटने या पद्धतीने 100 कार एकत्रित केले असून, त्यांची डागडुजी, दुरुस्ती करून त्या गरजूंसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा दुरुस्त केलेल्या 100 कारपैकी 33 कार त्याने गरजूंना पोहोचवल्या आहेत.