

अल्बर्टा : जगभरातील प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक केली असावी, असे पदोपदी जाणवते. अगदी मनुष्याचेदेखील तसेच आहे. पृथ्वीतलावर ज्याचा जन्म होतो, त्याला रंग-रूप सारे काही अनोखे लाभत असते; पण काही लोक आपल्या लूकवर फारसे खूश असत नाहीत. अशा परिस्थितीत ते मूळ रचनेशी छेडछाड करू लागतात. कोणी कॉस्मेटिक सर्जरी करून घेऊन चेहरा बदलून घेतो, तर कोणी शरीरातील भाग बदलून घेतो. आता तर अनेक जण लूक बदलण्यासाठी टॅटूचा आसराही घेतात.
असाच एक अवलिया कॅनडातील अल्बर्टा येथे राहतो. सोशल मीडियावर या अवलियाने आपल्यात झालेल्या ट्रान्स्फॉर्मेशनची छायाचित्रे शेअर केली असून, सोळा वर्षांच्या कालावधीत केवळ टॅटूच्या माध्यमातून किती मोठा व्यापक फेरबदल घडवला जाऊ शकतो, हेच त्याने अधोरेखित केले आहे.
वास्तविक, सोळा वर्षांपूर्वी त्याला कोणी फारसे विचारतदेखील नव्हते; पण आता परिस्थिती झपाट्याने बदलली असून, तो जिथे जातो, तिथे लोक त्यालाच पाहत राहतात आणि याचे कारण आहे एक्स्ट्रीम बॉडी मॉडिफिकेशन. या अवलियाने शरीरातील जवळपास प्रत्येक ठिकाणी टॅटू करवून घेतले आहेत.
2007 ते 2023 पर्यंतचा प्रवास
कॅनडातील अल्बर्टा येथे राहणार्या या अवलियाचे रेमी असे नाव असून, सोशल मीडियावर लाखो लोक त्याला फॉलो करतात. त्याने गेली कित्येक वर्षे आपल्या शरीरात बदल करण्यावर खर्ची घातले आहेत. 2007 मध्ये त्याच्या अंगावर एकही टॅटू नव्हता. या 16 वर्षांत मात्र त्याने आपला चेहरामोहराच बदलला आहे. लोकही त्याच्या टॅटू आर्टचे चाहते असून, आतापर्यंत रेमीने या छंदापोटी थोडेथोडके नव्हे, तर चक्क 78 लाख रुपये खर्च केले आहेत. आश्चर्य म्हणजे, रेमीचे आतापर्यंत समाधान झालेले नसून यापुढेही आपण टॅटू काढून घेतच राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे.