

वॉशिंग्टन ः विज्ञानातील सिद्धांतही अनेक वेळा गृहितकेच असतात. कालौघात नवे संशोधन आधीच्या सिद्धांताला छेद देणारे व नवा सिद्धांत स्थापन करणारे असू शकते. यापूर्वी लहान मातृतार्याभोवती महाकाय ग्रहाची निर्मिती होऊ शकत नाही, असे मानले जात होते. मात्र, एका महाकाय ग्रहाच्या शोधाने या समजालाही असाच छेद गेला. या ग्रहाचे नाव आहे ‘एनजीटीएस-1बी’. वार्विक विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. डॅनियल बेल्लिस यांनी म्हटले होते की, या ग्रहाचा शोध आमच्यासाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. इतक्या मोठ्या आकारमानाचा ग्रह इतक्या लहान तार्याजवळ असू शकत नाही, अशीच आमची धारणा होती.
या ग्रहाला चिलीतील अटाकामा वाळवंटात असलेल्या नेक्स्ट-जनरेशन ट्रांझिट सर्व्हे या दुर्बिणीतून पाहण्यात आले होते. हा ग्रह त्याच्या तार्याच्या अतिशय जवळ आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या अंतराच्या केवळ तीन टक्के अंतरच यामध्ये आहे. या ग्रहाला तार्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास अवघ्या 2.6 दिवसांचा कालावधी लागतो. अर्थातच, या ग्रहाचे तापमान अत्याधिक म्हणजे 530 अंश सेल्सिअस इतके आहे. या ग्रहाच्या मातृतार्याचा आकार अतिशय लहान असल्याने या ग्रहाला शोधणे कठीण होते. आकाशगंगेत असंख्य लहान आकाराचे तारे असून अशा प्रकारच्या ग्रहांचा शोध लागण्याची आणखी शक्यता आहे, असे वार्विक विद्यापीठातील प्रा. पीटर व्हिटले यांनी म्हटले आहे. हा अतिविशाल ग्रह आकाराने आपल्या सौरमालेतील गुरू ग्रहाइतक्या आकाराचा आहे. तो एका लाल तार्याभोवती फिरतो. हा तारा आपल्या सूर्याच्या निम्म्याच आकाराचा आहे. ही सौरमाला पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या ग्रहाचे आणि त्याच्या मातृतार्याचे गुणोत्तर आतापर्यंत शोध लावण्यात आलेल्या ग्रहांच्या तुलनेत सर्वात वेगळे आहे.