

वॉशिंग्टन ः जगभरात अनेक प्रकारच्या स्पर्धा होत असतात. अमेरिकेत अशीच एक वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये एक अनोखा टास्क देण्यात आला होता. मंगळ ग्रहावरून आलेला रहस्यमयी सिग्नल डिकोड करण्याचा हा टास्क होता. युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘एक्झोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटर’ (टीजीओ) ने हा सिग्नल पृथ्वीवर पाठवला होता. आता अमेरिकन बाप-लेकीने हा सिग्नल डिकोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
केन शॅफिन आणि केली शॅफिन अशी मेसेज डिकोड करणार्या पिता आणि मुलीचे नाव आहे. सेटी संस्था, ग्रीन बँक वेधशाळा, इसा आणि इनाफ यांनी संयुक्तपणे नागरिक वैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली. पृथ्वीवर असलेल्या तीन रेडिओ खगोलशास्त्र वेधशाळांनी हा सिग्नल कॅप्चर केला होता. जगभरातील पाच हजारांहून अधिक नागरिक वैज्ञानिकांनी हा सिग्नल डिकोड करण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्वजण ऑनलाईनचे हे काम करत होते. अमेरिकेच्या केन आणि केली शॅफिन यांना सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. या सिग्नलमध्ये पांढरे ठिपके आणि रेषांचे पाच गट दिसून येतात. काळ्या रंगाच्या पृष्ठभागावर हे पांढरे ठिपके आहेत.
या ठिपक्यांचा अर्थ म्हणजे पेशींच्या निर्मिती म्हणजेच जीवनाच्या निर्मितीकडे असा काढण्यात आला आहे. डिकोड केलेल्या संदेशात पाच अमिनो अॅसिड असतात, जे सजीवाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सर्व जैविक आण्विक आकृती आहेत. म्हणजेच जीवन देणार्या अमिनो आम्लांचे आकृतीबंध आहेत, असे केन आणि केली यांनी सांगितले. या ब्लॉक्समध्ये 6, 7, 8 असे पिक्सेलचे अणुक्रम सापडतात. हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे आहे. या आकृत्यांमधील रेषा सिंगल आणि डबल बाँडस्पासून बनविल्या जातात. सामान्य अणू आकृतीप्रमाणे ठिपके त्यांना जोडण्याचे काम करतात, असे तर्क मांडले जात आहेत. मात्र, अद्याप या मेसेजचा पूर्ण अर्थ समजू शकलेला नाही.