

बीजिंग : चीनच्या नानजिंग इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड पॅलिओंटोलॉजीमधील संशोधकांनी म्हटले आहे की, त्यांना प्रागैतिहासिक काळातील टेपवर्म म्हणजेच पट्टकृमीचा शोध लागला आहे. ही पट्टकृमी अम्बरमध्ये म्हणजेच झाडाच्या डिंकात अडकून जशीच्या तशी राहिली होती. म्यानमारमध्ये हे अम्बर संशोधकांना सापडले होते.
इतक्या वर्षांपूर्वीच्या पट्टकृमीचा शोध ही एक अतिशय दुर्मीळ घटना आहे. त्याच्यामध्ये त्याच्या प्राचीन यजमानाच्या शरीरातील डीएनएच्या खुणाही मिळू शकतात. याचे कारण म्हणजे असे पट्टकृमीसारखे जीव अन्य प्राण्यांच्या शरीरात परजीवी म्हणून राहतात. पट्टकृमी या एक मिलीमीटरपेक्षा कमी ते 30 मीटर लांबीपर्यंतच्याही असतात. या कृमी सर्व जीवांमध्ये आसरा घेऊ शकतात. ल्युओ चिहांग या संशोधकाने सांगितले की, हे जीवाश्म संशोधनासाठी अतिशय उपयुक्त असे आहे. डायनासोरच्या काळातील ही कृमी आहे. त्याच्यामध्ये त्या काळातील विविध डायनासोरचे डीएनए नमुनेही असू शकतात. कदाचित, सागरी डायनासोरच्या शरीरात असा पट्टकृमी असू शकतो. हा डायनासोर मृत झाल्यानंतर त्याच्या आतड्यातून बाहेर पडून तो झाडाच्या डिंकात अडकला असावा.