आता रक्तचाचणीतूनही होईल कर्करोगाचे अचूक निदान | पुढारी

आता रक्तचाचणीतूनही होईल कर्करोगाचे अचूक निदान

लंडन : बहुतांश वेळा उशिरा निदान झाल्याने कर्करोगावरील उपचार कठीण बनतात. योग्यवेळी निदान झाल्यावर वेळेवर उपचार घेऊन रुग्ण कर्करोगावर मातही करू शकतो व त्याचे प्राण वाचू शकतात. आता कर्करोगाचे असे योग्यवेळी निदान होण्यासाठी नव्या नव्या पद्धती शोधल्या जात आहेत. ब्रिटन मधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी यासाठी रक्तचाचणी विकसित केली आहे. या सोप्या व स्वस्त चाचणीमुळे कर्करोगाचा छडा लावता येऊ शकेल असे त्यांनी म्हटले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या एका पथकाने कर्करोगाच्या निदानासाठी चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरींच्या माध्यमातून रक्तातील मेटाबोलिटिक्सचे मोजमाप घेण्याची पद्धत शोधली आहे.

मेटाबोलिक म्हणजेच चयापचय क्रियेतून निघणारा शेवटचा पदार्थ म्हणजे मेटाबोलिटिक्स. चयापचय क्रियेमुळेच शरीराची सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असते. निरोगी लोक, लोकलाईज्ड कॅन्सर असलेले लोक आणि मेटास्टेटिक कॅन्सरने ग्रस्त लोकांमधील चयापचयाशी संबंधित ‘प्रोफाईल’चा या संशोधनासाठी वापर करण्यात आला.

अनेक प्रकारच्या कर्करोगांचा छडा लावण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या लोकांमध्ये रोगाची कोणतीही लक्षणे नाहीत, त्यांच्यामध्येही अशा छुप्या रोगाचा सुगावा लागू शकतो. त्यामुळे प्रारंभिक स्तरावरच कर्करोगाचे निदान होऊ शकते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील कर्करोग तज्ज्ञ व अव्वल संशोधक जेम्स लार्किन यांनी सांगितले की विभिन्न चयापचय प्रक्रियांमुळे कर्करोगाच्या पेशींची विशेष ओळख होते.

ट्यूमरपासून बाहेर पडणार्‍या मेटाबोलाइटस्ना कर्करोगाच्या अचूक माहितीसाठी बायोमार्करच्या रूपाने कसे वापरले जाऊ शकते, हे आम्ही सध्या पाहत आहोत. डॉ. लार्किन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 300 रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांचा या संशोधनासाठी अभ्यास केला. त्यांच्या चाचणीने वीस रुग्णांपैकी 19 रुग्णांमध्ये वेगवेगळ्या ट्यूमरच्या अस्तित्वाचा योग्यप्रकारे शोध घेतला.

Back to top button