उंदरांमध्ये म्युटेट होऊन माणसात आला ओमायक्रॉन! चिनी तज्ज्ञांचे मत | पुढारी

उंदरांमध्ये म्युटेट होऊन माणसात आला ओमायक्रॉन! चिनी तज्ज्ञांचे मत

बीजिंग : जगभर महामारीचे कारण बनलेला ‘सार्स-कोव्ह-2’ हा नवा कोरोना विषाणू कुठून आला याबाबत विचारल्यावर ताकास तूर लागू न देणारा चीन आता ओमायक्रॉन कुठून आला याबाबतची माहिती जगाला देऊ लागला आहे. चिनी तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन हे कोरोनाचे नवे व्हेरिएंट उंदरांमध्ये म्युटेट होऊन माणसात आले. प्राण्यांमधून माणसात फैलावणार्‍या आजारांच्या या कन्सेप्टला ‘होस्ट जंपिंग’ असे म्हटले जाते.

ओमायक्रॉनच्या प्रारंभिक तपासणीत वैज्ञानिकांनी या व्हेरिएंटमध्ये सुमारे 50 म्युटेशन्स पाहिले होते. एकट्या स्पाईक प्रोटिनमध्येच म्हणजेच पृष्ठभागावरील काट्यांसारख्या रचनेतच 32 म्युटेशन्स (बदल) झालेले दिसून आले होते. स्पाईक प्रोटिनच्या सहाय्यानेच विषाणू शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करतो. ओमायक्रॉन ज्या वेगाने फैलावत आहे त्यामागे त्याच्या या म्युटेशन्सचे कारण आहे.

त्यामुळे ओमायक्रॉन नेमका कुठून आला याचे कुतुहल संशोधकांना होते. माणूस किंवा सस्तन प्राण्यांमध्ये कोणताही विषाणू इतका म्युटेट होत नाही. त्यामुळे ओमायक्रॉनचे हे ‘होस्ट जंपिंग’चे प्रकरण असावे असे संशोधकांना वाटले. त्याच्या अभ्यासातून असे दिसून आले की ओमायक्रॉनमध्ये आढळणारे म्युटेशन्स उंदरांमधील विषाणूच्या म्युटेशन्सशी मिळतेजुळते आहेत. याचा अर्थ ओमायक्रॉन व्हेरिएंट उंदरांच्या शरीरात सहजपणे राहू शकतो.

ओमायक्रॉनचे म्युटेशनशिवायचे मूळ रूप मानवातून उंदरांमध्ये गेले. त्यानंतर उंदराच्या शरीरात त्याचे वेगाने म्युटेशन झाले जेणेकरून उंदरांना ते गंभीररीत्या संक्रमित करू शकेल. त्यानंतर ते म्युटेशननंतर अधिकच घातक बनलेले व्हेरिएंट उंदरांमधून पुन्हा माणसात संक्रमित झाले. असेच काहीसे इबोला आणि पोलिओ विषाणूंबाबतही दिसून आले होते.

Back to top button