२४ तासांत कोरोनाचे मुंबईत तब्बल ३ हजार ६७१ रुग्ण | पुढारी

२४ तासांत कोरोनाचे मुंबईत तब्बल ३ हजार ६७१ रुग्ण

मुंबई/नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे मुंबईत तब्बल 3 हजार 671, तर ठाण्यात 864 नवे रुग्ण आढळल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यासह 5 शहरांतील कोरोना वाढीवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे. या पार्श्‍वभूमीवर येऊ घातलेले निर्बंध खास करून मुंबई आणि ठाण्यात अधिक कडक असू शकतात.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाठवलेल्या पत्रात असे स्पष्ट म्हटले आहे की, कोरोनाचा अत्यंत झपाट्याने सुरू झालेला संसर्ग तात्काळ रोखा, कोरोनाच्या चाचण्या वाढवा. कोरोनाचे रुग्ण शोधण्यास उशीर झाला की त्यातून आणखी रुग्णवाढ होईल आणि कोरोनाच्या बळींचे प्रमाण वाढण्याचाही धोका आहे.

त्यामुळे खास करून महाराष्ट्र सरकारने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि नागपूर या पाच शहरांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भूषण यांनी हे पत्र दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक तसेच झारखंड या राज्यांनाही पाठवले आहे. मात्र, महाराष्ट्राला पाठवलेल्या पत्रात या पाच शहरांचा विशेष उल्‍लेख करण्यात आला आहे.

गेल्या आठवडाभरापासून मुंबईत पुन्हा कोरोना वाढण्यास सुरुवात झाली. दररोज एक ते दीड हजार रुग्ण समोर येत आहेत. बुधवारी 29 डिसेंबरला शहरात 2510 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात 3 हजार 671 रुग्णांची नोंद झाली. एकाच ठिकाणी पाच पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील 88 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण

राज्यात नवीन आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढल्याने कोरोना बाधित रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या आठवड्याभरात राज्यात 9320 रुग्णांची भर पडली. त्यातील 5478 रुग्ण केवळ मुंबईत आढळले आहेत. ही रुग्णवाढ 60 टक्के इतकी आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 5338 नवे रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक 3928 मुंबईत, तर त्याखालोखाल ठाण्यात 864 रुग्ण आढळले. पुण्यातही 520 नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनाचे रुग्ण 24 तासांत संख्येने दुप्पट होत असल्याने आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर 9 टक्के, ठाण्याचा 6 टक्के, पुण्याचा 5 तर रायगडचा 4 टक्के इतका पॉझिटिव्हिटी दर आढळून आला आहे. आगामी काळात रुग्णसंख्येचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने टासक फोर्सच्या बैठकीत सर्वांनीच चिंता व्यक्त केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुंबईकर कोरोनाचे कोणतेही नियम पाळत नाहीत. जमावबंदी असूनही सगळीकडे गर्दी दिसते. त्यातून रुग्णवाढ सुरू झाली आहे. आता वाढत असलेल्या रुग्णांमध्ये 90 टक्के रुग्ण हे टॉवरमधील आहेत. कौटुंबिक कार्यक्रम, लग्नसमारंभात बहुतांश रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसते, असे मुंबई महापालिकचेे अतिरिक्‍त आयुक्‍त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Back to top button