

वॉशिंग्टन : आपल्या सौरमालिकेत नववा ग्रहही असल्याचे अनेकवेळा म्हटले जाते. अर्थात, प्लूटोची 'ग्रह' म्हणून मान्यता खगोल वैज्ञानिकांनी काढून त्याला एक 'खुजा ग्रह' ठरवल्यानंतर सध्या ग्रहमालिकेत आठच ग्रह आहेत. मात्र, या नवव्या ग्रहाचा शोध सातत्याने घेतला जात होता. आता याबाबतच्या एका नव्या अहवालात चकित करणारी बाब समोर आली आहे. 'अॅन्युअल रिव्ह्यू ऑफ अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिव्ह्यू पेपरनुसार, सौरमंडळाच्या 'थर्ड झोन'मध्ये पृथ्वीचा 'जुळा ग्रह' असू शकतो.
'थर्ड झोन' हे अंतराळातील एक असे क्षेत्र आहे जे नेपच्यूनपासून पुढे अंतराळात पसरलेले आहे. या क्षेत्रात कुठे ना कुठे हा पृथ्वीचा 'जुळा ग्रह' असू शकतो. ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीचे ग्रह वैज्ञानिक ब्रेट ग्लॅडमॅन आणि अॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या कॅथरीन वोल्क यांनी सांगितले की, आपल्याकडे सौरमंडळाच्या सुरुवातीच्या दिवसांचे अनेक उत्कृष्ट मॉडेल्स उपलब्ध आहेत, ज्यांना सुपर कॉम्प्युटर्सच्या सहाय्याने बनवण्यात आले आहे. हे मॉडेल सौरमंडळातील एखाद्या अज्ञात ठिकाणी एका अतिरिक्त ग्रहाच्या अस्तित्वाकडे संकेत करतात. यापूर्वी अशाबाबतीत एक संशोधन करण्यात आले होते, ज्यामधून सौरमंडळातील नववा ग्रह आधीपेक्षा अधिक स्पष्ट झाला होता.
वैज्ञानिकांना आधी अनुमान होते की, 'प्लॅनेट 9' हा सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा 18,500 वर्षांमध्ये पूर्ण करतो. याचा अर्थ त्याच्यावरील 'एक वर्ष' हे आपल्या 18,500 वर्षांचे असते. मात्र, नव्या संशोधनाने ही संख्या घटवून 7,400 वर्षे केली आहे. हा ग्रह पृथ्वी आणि सूर्याच्या अधिक जवळ असू शकतो, असेही संशोधकांना वाटते. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माईक ब्रा ऊन आणि कॉन्स्टेंटिन बॅटगिन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
ब्राऊन यांनी सांगितले की, 'प्लॅनेट 9'चा शोध लावण्यासाठी अद्याप काही वर्षे बाकी आहेत. गुरुत्वाकर्षणाची तपासणी करणार्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा ग्रह पृथ्वीपेक्षा सहा पटीने मोठा असू शकतो. तो पृथ्वी किंवा मंगळासारखा खडकाळ, ठोस पृष्ठभागाचा आहे की गुरू, शनीसारखा निव्वळ वायूंचा गोळा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.