Germany Omicron : जर्मनीमध्ये कोरोना निर्बंधांविरुद्ध नागरिक पुन्हा रस्त्यावर | पुढारी

Germany Omicron : जर्मनीमध्ये कोरोना निर्बंधांविरुद्ध नागरिक पुन्हा रस्त्यावर

जर्मनी; पुढारी ऑनलाईन : जर्मनीमध्ये ( Germany Omicron ) लागू केलेल्या कोरोना निर्बंधाविरुद्ध पुन्हा भडका उडला आहे. तेथील बाव्हेरियन राज्यातील श्वेनफर्ट शहरामध्ये लागू करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधाविरुध्द नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. रविवारी घडलेल्या घटनेत आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक पोलिसांना लाठचार्ज आणि पेपर स्प्रेचा वापर करावा लागला.

ओमायक्रॉनचा ( Germany Omicron ) वाढता संसर्ग लक्षात घेऊन जर्मनीमध्ये कडक कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांना विरोध दर्शवत जर्मनीमध्ये २२ डिसेंबर रोजी नागरिकांकडून मोठे आंदोलन करण्यात आले होते. पुन्हा रविवारी (दि. २७) बाव्हेरियन राज्यातील श्र्वेनफर्ट शहरात शंभरहून अधिक नागरिक एकत्र येत कोरोना निर्बंधा विरोधात रॅली काढली.

या रॅलीतील आंदोलकांना पोलिसांनी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे काहीकाळ तणावपूर्ण वातवरण निर्माण झाले. आक्रमक आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि बळाचा देखिल वापर करावा लागला. ( Germany Omicron )

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक आक्रमक झाले होते त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी एक महिला आपल्या ४ वर्षांचा मुलाला घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाली होती. पोलिसांनी त्या महिलेस लहान मुलाला घेऊन आंदोलनात सहभागी न होण्याचे वारंवार आवाहन केले होते. तसेच खबरदार देखिल करण्यात आले होते. परंतु, त्या महिलेने पोलिसांकडे दुर्लक्ष केले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज व पेपर स्प्रेचा वापर केला. तेव्हा त्या लहान मुलावर पेपर स्प्रेचा परिणाम झाल्यामुळे पोलिसांना त्या मुलावर तातडीने उपचार करावे लागले. यावेळी मोठी दुर्घटना होण्यापासून टळली गेली अशी माहिती पोलिसांनी आपल्या प्रेस रिलिजमध्ये दिली आहे.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये उडालेल्या संघर्षामध्ये आठ पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेत जबाबदार धरत आठ आंदोलकांना अटक करण्यात आलेचे पोलिसांनी सांगितले आहे.

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर जर्मनीमध्ये ( Germany Omicron ) कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मागील मंगळवारपासून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये लसीकरण पूर्ण झालेले व कोरोनातून बरे झालेले फक्त १० लोकच एकत्र येऊ शकतात. ज्यांचे लसीकरण झाले नाही असे दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

जर्मनी मध्ये ७०.८ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच लसीकरणाची मोहीम अगदीच संथपणे राबवली जात आहे. येथे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे येथील जनतेचा वारंवार उद्रेक होत आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्षपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. जर्मनीसह संपूर्ण युरोपमध्ये देखिल हीच परिस्थिती आहे.

Back to top button