आता खाता येणार रंगीत बटाट्याची भाजी; रोगप्रतिकारक क्षमताही वाढणार, नवे वाण विकसित | पुढारी

आता खाता येणार रंगीत बटाट्याची भाजी; रोगप्रतिकारक क्षमताही वाढणार, नवे वाण विकसित

ग्वाल्हेर :

सध्या देश-विदेशात अनेक भाज्या वेगळ्या रंगरूपातही उपलब्ध होत आहेत. आता चक्क बटाटाही रंगीबेरंगी झालेला पाहायला मिळू शकतो. खास कोरोना काळात हा रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकणारा बटाटा विकसित केला जात आहे. ग्वाल्हेरमधील आलू अनुसंधान केंद्रात त्याचे नवे वाण विकसित करण्यात आले असून लवकरच ते शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले जाईल.

केंद्राच्या संशोधकांनी बरेच संशोधन करून ही रंगीत बटाट्याची नवी प्रजाती विकसित केली आहे. तिच्यामध्ये झिंक, आयर्न आणि कॅटरिन हे घटक मोठ्या प्रमाणात आहेत. वैज्ञानिकांचा दावा आहे की या बटाट्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढून कोरोनाशी चांगला मुकाबला करता येणे शक्य आहे.

तसेच लहान मुले आणि महिलांमधील अ‍ॅनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेची समस्या या बटाट्याच्या सेवनाने दूर होऊ शकते. या बटाट्यांचा बाह्य नव्हे तर आतील भाग रंगीत असेल. असे बटाटे खाल्ल्याने शरीरातील आयर्न म्हणजेच लोह तत्त्वाची कमतरताही दूर होईल. गर्भवती महिलांना अशा बटाट्याचे सेवनाचा लाभ मिळू शकेल. चीननंतर भारत हाच जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश आहे. आता हे रंगीत बटाटे लोकांना अधिक आकर्षित करतील.

Back to top button