शरीरातील ‘या’ अज्ञात भागाचा लागला शोध | पुढारी

शरीरातील 'या' अज्ञात भागाचा लागला शोध

ज्यूरिख :

माणूस सध्या चंद्र, मंगळ आणि अगदी सूर्याचाही वेध घेत आहे; पण आपल्याच शरीराची अद्याप माणसाला पूर्ण माहिती झालेली नाही. आता संशोधकांनी मानवी शरीराचा एक अज्ञात भाग शोधून काढला आहे. हा भाग जबड्याच्या मॅस्सेटर स्नायूंच्या खोल स्तरात आढळून आला. हे स्नायू जबड्याच्या खालील भागाला वर उचलतात आणि चर्वणाच्या क्रियेत त्यांची मोठी भूमिका असते.

‘मॉडर्न अ‍ॅनाटोमी टेक्स्टबुक’मध्ये मॅस्सेटर स्नायूंच्या दोन स्तरांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक स्तर वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला असतो. आता याच ठिकाणी हा नवा भाग शोधण्यात आला आहे. त्याची माहिती ‘एनल्स ऑफ अ‍ॅनाटोमी’ या सायन्स जर्नलच्या ऑनलाईन एडिशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी म्हटले आहे की काही जुन्या ग्रंथांमध्ये जबड्याच्या स्नायूमध्ये एक विशिष्ट अवयव असल्याचे म्हटले होते. तो शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

त्यासाठी बारा शव फॉर्मलाडेहाईडमध्ये संरक्षित करण्यात आले. या संशोधनातून थक्क करणारे निष्कर्ष समोर आले. त्यांना प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या जागेपासून काही अंतरावर एक वेगळा भाग दिसून आला. वैज्ञानिकांनी संशोधनासाठी काही काळापूर्वीच मृत झालेल्या लोकांच्या सोळा मृतदेहांचे सिटी स्कॅन केले आणि एका जिवंत माणसाच्या एमआरआयशी त्याची तुलना केली. त्यावेळी त्यांना आढळले की जबड्याच्या स्नायूंमध्ये स्नायूंचा तिसरा स्तरही असतो. हा खोलवरील स्तर ‘जायगोमॅटिक प्रोसेस’ने चालतो. हीच प्रोसेस गालाच्या कोमल हाडांना ठोस बनवते. स्वित्झर्लंडमधील बेसल विद्यापीठातील स्जिल्विया मेजी यांनी याबाबतची माहिती दिली.

Back to top button