लंडन ः कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर अनेक प्रकारच्या डायनासोरचे अक्षरशः साम—ाज्य होते. डायनासोर च्या अनेक प्रजातींचा अद्यापही शोध लावण्यात येत असतो. आता संशोधकांनी 12.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर वावरणार्या डायनासोरच्या एका प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीच्या डायनासोरच्या तोंडात करवतीसारखे दात होते आणि त्यांची शेपूट कोंबडीच्या शेपटीसारखी वर उचललेली होती. हे डायनासोर दहा फूट लांबीचे होते.
या डायनासोर चे जीवाश्म 2004 मध्ये बि—टनच्या आईल ऑफ व्हाईट बेटावर सापडले होते. त्यावेळेपासून त्याच्यावर संशोधन सुरू होते. आता संशोधकांनी या डायनासोरच्या शारीरिक रचनेबाबत उलगडा करण्यात यश मिळवले आहे. हा डायनासोर वेलोसिरॅप्टरचा प्राचीन नातेवाईकच आहे. आईल ऑफ व्हाईटच्या दक्षिण तटावर कॉम्पटन बे येथे माईक ग्रीन यांनी त्याचे जीवाश्म शोधले होते. त्यांच्या सन्मानार्थ या डायनासोरला 'व्हेक्टिरॅप्टर ग्रीनी' असे नाव देण्यात आले आहे. बाथ युनिव्हर्सिटी आणि पोर्टसमाऊथच्या पॅलियोन्टोलॉजिस्टनी या जीवाश्मावर संशोधन केले. त्यांनी सांगितले की दहा फूट लांबीचा हा डायनासोर वेलोसिरॅप्टर प्रजातीमधील सर्वाधिक लांबीचा होता. पंख असलेला हा डायनासोर अत्यंत क्रूरपणे आपली शिकार पकडत असे. त्यासाठी तो आपले तीक्ष्ण दात आणि टोकदार पंज्यांचा वापर करीत असत. त्यामुळे तो तत्कालीन सर्वात निर्दयी शिकार्यांपैकी एक होता. तो आकाराने अतिशय मोठा व वजनदार शिकारी होता. त्याची हाडे बरीच जाड आणि मोठी होती. तो छोट्या प्राण्यांना नव्हे तर आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यांना मारून खात असे. त्याची शारीरिक रचना पाहता तो झाडावरही चढून बसू शकत असे.