कोरोना विषाणूशी लढण्यास शार्कची अँटिबॉडी उपयुक्त  | पुढारी

कोरोना विषाणूशी लढण्यास शार्कची अँटिबॉडी उपयुक्त 

कॅलिफोर्निया : संपूर्ण जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना व्हायरसवर प्रभावी उपचार शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशोधकांना यासंबंधी एक नवा पर्याय सापडला आहे. या संशोधकांना एका सागरी जीवामध्ये अशी अँटिबॉडी सापडली आहे की, त्याच्या मदतीने कोरोना व त्याच्या नवनव्या व्हेरियंटवर उपचार करण्यास मदत मिळू शकते. हा सागरी जलचर म्हणजे शार्क मासा होय.

अमेरिकेतील विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातीलनुसार शार्कच्या इम्यून सिस्टीममध्ये आढळणारे अँटिबॉडीसारख्या प्रोटिनच्या मदतीने केवळ कोरोनालाच नव्हे तर त्याच्या नवनव्या व्हेरियंटलाही रोखले जाऊ शकते. या प्रोटिनला ‘व्हीएनएआर’ या नावाने ओळखले जाते.

संशोधकांच्या मते, शार्कमधील ‘व्हीएनएआर’ हे प्रोटिन अत्यंत सूक्ष्म असले तरी ते कोरोनाच्या स्पाईक प्रोटिनशी विशेषप्रकारे जोडू शकते. यामुळे हा प्रोटिन संसर्ग रोखण्याच्या बाबतीत अधिक सक्षम बनतो. दरम्यान, स्पाईक प्रोटिनमुळेच कोरोना मानवी कोशिकांना संक्रमित करत असतो. शार्क माशाच्या शरीरातील ‘व्हीएनएआर’ या प्रोटिनमुळे कोरोनावरील उपचारासाठी स्वस्तात औषध विकसित केले जाऊ शकते. दरम्यान, याची मानवावर अद्याप चाचणी घेण्यात आलेली नाही.

दरम्यान, विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी मेडिसिनचे असो. प्रोफेसर आरॉन लेबेयू यांनी सांगितले की, कोरोनाचे नव नवे व्हेरियंट तयार होत आहे. याविरुद्ध लढण्यासाठी आम्ही व्हीएनएआरपासून नवे शस्त्र तयार करत आहोत. ज्याच्या मदतीने या महामारीशी लढण्यास मदत मिळेल.

Back to top button