एकाच वेळी तीस कोटी अंडी घालताे ‘हा’ मासा! | पुढारी

एकाच वेळी तीस कोटी अंडी घालताे 'हा' मासा!

न्यूयॉर्क : महासागरांच्या अथांग खोलीत अनेक अनोख्या जलचरांची रहस्यमय दुनिया लपलेली असते. त्यामधील अनेक जलचर अनेक वैशिष्ट्यांनी माणसाला थक्क करीत असतात. या जलचरांमध्येच ‘जायंट सनफिश’ नावाच्या माशाचा समावेश होतो. हा मासा माणसाप्रमाणेच जणू काही सूर्यस्नान घेण्यासाठी किनार्‍यालगत उथळ पाण्यात येत असतो. त्यामुळे त्याला ‘सनफिश’ असे म्हटले जाते. हा मासा एकाच वेळी तीस कोटी अंडी घालतो!

या माशाला ‘कॉमन मोला’ किंवा ‘मोला-मोला’ या नावानेही ओळखले जाते. अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या लगुना बीचवर नुकताच असा मोठा सनफिश दिसून आला आणि त्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. हा मासा चौदा फूट लांबीच्या पॅडलबोर्डजवळ दिसला आणि त्याची लांबी नऊ ते दहा फूट असण्याची शक्यता वर्तवली गेली. मादी सनफिश एकाच वेळी तीस कोटी अंडी देऊ शकते. भूतलावर असलेल्या कोणत्याही प्रजातीमध्ये अंडी घालण्याचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.

मोठे डोके आणि चमकत्या डोळ्यांसाठीही हे मासे ओळखले जातात. एका रिपोर्टनुसार ऑक्टोबरमध्ये पकडण्यात आलेल्या एका सनफिश माशाची लांबी 10.5 फूट होती. त्याचे वजन 2 हजार किलो होते. आता 2 डिसेंबरला हा सनफिश दिसून आला. रिच जर्मन आणि त्याचा मित्र मॅट व्हीटन हे बीचवर डॉल्फिन पाहण्यासाठी आले असता त्यांना हा सनफिश दिसून आला.

हा मासा सूर्यस्नान करण्यासाठी बर्‍याच वेळा किनार्‍यावर येतो व त्यामुळे पर्यटकांनाही दिसतो. हा मासा आकाराने मोठा असला तरी अतिशय शांत असतो. समुद्रातील केवळ किलर व्हेल आणि शार्कच त्याला आपली शिकार बनवू शकतात. हे मासे प्रशांत आणि अटलांटिक महासागरात अधिक प्रमाणात दिसतात. ते जेलीफिश, स्क्वीड आदींना प्रामुख्याने आपली शिकार बनवतात.

 

Back to top button