गंगा यमुना नदी : गंगा-यमुनेच्या संगमाखाली आढळले लुप्‍त नदीचे पुरावे | पुढारी

गंगा यमुना नदी : गंगा-यमुनेच्या संगमाखाली आढळले लुप्‍त नदीचे पुरावे

नवी दिल्ली : आजपर्यंत खोदाईवेळी गावे, इमारती, मूर्ती अथवा अन्य वस्तू सापडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, प्रयागराजमध्ये एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. येथे नद्यांच्या खाली आणखी एक लुप्‍त नदी वाहत असल्याचे पुरावे सापडले आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने करण्यात आलेल्या ‘इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक सर्व्हे’दरम्यान ही आश्‍चर्यकारक बाब उघड झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आढळू शकते आणि ते भविष्यात उपयोगी पडू शकते, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.

‘अ‍ॅडव्हान्स्ड अर्थ अँड स्पेस सायन्स’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार, प्रयागराजमध्ये सध्या असलेल्या गंगा आणि यमुना या नद्यांच्या संगमाखाली एक प्राचीन नदी आढळून आली आहे. हे संशोधन ‘सीएसआयआर-एनजीआरआय’च्या शास्त्रज्ञांनी संयुक्‍तपणे केले आहे. या शास्त्रज्ञांच्या मते, संगमाखालील नदीचा संबंध थेट हिमालयाशी असू शकतो. यामुळे तिसरी नदी ही सरस्वतीही असू शकते. धार्मिक मान्यतेनुसार संगम म्हणजे तीन नद्यांचे मीलन होय. मात्र, प्रयागराजचा विचार केल्यास वैज्ञानिकद‍ृष्ट्या सरस्वती नदी सुकली आहे. यामुळे संगमाखाली तिसरी नदी आढळून येणे, ही एक आश्‍चर्यकारक घटना आहे.

खरे तर शास्त्रज्ञ पाण्याचा शोध घेण्यासाठी ‘इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक सर्व्हे’ करत होते. जेणेकरून जमिनीखालील पाण्याचा शोध लागू शकेल. ज्याचा वापर पिण्यासाठी, शेती व अन्य कारणांसाठी केला जाईल. यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरवर ‘ड्यूल मोमेंट ट्रांझिट इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक’ तंत्र बसविले आणि गंगा-यमुनेचे इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक मॅपिंग केले.

हेही वाचा

Back to top button