टोकियो ः काही जोडप्यांचं नातं हे प्रेमापलीकडे जाऊन प्रेरणाोत असतं, कित्येकांसाठी आदर्शस्थानी असतं. अशाच एका नात्याची गोष्ट काही वर्षांपूर्वी समोर आली आणि नकळत ती वाचणार्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. ही गोष्ट आहे जपानमधील एका अशा व्यक्तीची, ज्यानं 2011 मध्ये इथं आलेल्या भीषण सुनामीमध्ये पत्नीला गमावलं. हा माणूस जवळपास दशकभराहून अधिक काळापासून त्याच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी खोल समुद्रात जात होता. खरे तर लाटेबरोबर तिचा मृतदेह कुठे तरी किनार्यावर आला असेल याची त्याने कल्पनाही केली नाही.
यासुओ ताकामात्सु असं या व्यक्तीचं नाव असून, त्यानं जपानच्या ओनागावा इथून त्सुनामीच्या संकटात पत्नीला गमावलं. या नैसर्गिक आपत्तीनंतर युको ताकामात्सु पुन्हा कधीच सापडल्या नाहीत. पण, त्यांचे पती मात्र अगदी 2013 पर्यंत पत्नीच्या मृतदेहाचा शोध घेताना दिसले. दर आठवड्यात पत्नीचा शोध घेण्यासाठी यासुओ ताकामात्सुनं समुद्रात उडी मारली आणि हाती अपयशच लागलं. पण, या अपयशानं खचेल तो हा माणूस कसला! एका मुलाखतीदरम्यान या प्रयत्नाविषयी सांगताना, आपल्या वाट्याला अपयश येणार याची कबुली खुद्द यासुओनंच दिली.
अथांग समुद्रामध्ये पत्नी सापडावी असं वाटतं; पण ती सापडणार नाही, हेसुद्धा खरं. कारण इतक्या महाकाय समुद्रामध्ये तिला शोधावं लागेल, हा शोध संपणार नाही, असं तो म्हणाला. या मोहिमेमध्ये यासुओ एकटा नसून यामध्ये त्सुनामीच्या संकटानं प्रभावित झालेल्यांचा शोध घेणार्या तज्ज्ञांची त्याला मदत मिळत होती. जपानमध्ये 11 मार्च 2011 मध्ये भीषण त्सुनामीनं हाहाकार माजवला होता. या आपत्तीदरम्यान समुद्राच्या गर्भातून 40.5 मीटर उंच लाटा किनार्यावर धडकल्या होत्या. जवळपास 20 हजार नागरिकांनी या संकटात प्राण गमावले, तर 2,500 नागरिक आजही बेपत्ता असल्याचं सांगितलं जातं. यामध्येच यासुओच्या पत्नीचाही समावेश आहे.