जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर

जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर

बीजिंग : चीनच्या वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान आकाराचा ब्रेन सेन्सर बनवला आहे. या सेन्सरचा आकार मोहरीच्या दाण्यापेक्षाही लहान आहे. मेंदूची दुखापत किंवा कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या देखभालीची पद्धत या सेन्सरमुळे बदलू शकते. हा वायरलेस हायड्रोजेल आधारित सेन्सर बायोडिग्रेडेबल आहे. त्याला बाहेरील अल्ट्रासाऊंड तपासणीच्या मदतीने तापमान, पीएच, इंट्राक्रॅनिल दबाव आणि रक्तप्रवाह मोजण्यासाठी मेंदूमध्ये बसवता येऊ शकते.

परीक्षणांमधून हे दिसून आले आहे की, सध्या वापरल्या जाणार्‍या ब्रेन सेन्सरच्या तुलनेत हा सेन्सर अधिक अचूकतेने मोजमाप घेऊ शकतो. 'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, वायरलेस इम्प्लँटेबल सेन्सरवरील सध्याच्या संशोधनांच्या तुलनेत आमचा मेटाजेल सेन्सर विशेष रूपाने इम्प्लँटचा आकार, डिकूप्ड मल्टिपल सिग्नल आणि बायोडिग्रेडेबिलिटीच्या संबंधात अधिक लाभ प्रदान करतो.

वुहानमधील हुआजोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक जँग जियानफेंग यांनी सांगितले की, आम्ही जो इंजेक्टेबल मेटाजेल अल्ट्रासाऊंड सेन्सर विकसित केला आहे, तो प्रगत एकुस्टिक मेटामटेरियल तंत्रज्ञानाचा वापर करतो. त्याचा आकार केवळ 2 बाय 2 बाय 2 घन मिलीमीटर आहे. अगदी तिळाच्या दाण्यासारखा! उंदीर आणि डुकरांमध्ये या सेन्सरच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, त्या यशस्वीही झाल्या आहेत. हा सेन्सर बायोडिग्रेडेबल असल्याने तो आपोआप नष्ट होऊन जातो. तो काढण्यासाठी पुन्हा सर्जरी करावी लागत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news