बदनामीच्या भीतीने भारतीय पुरूष टाळतात मानसिक आरोग्याबाबतचा सल्ला

बदनामीच्या भीतीने भारतीय पुरूष टाळतात मानसिक आरोग्याबाबतचा सल्ला

नवी दिल्ली : आपण आपल्या शारीरिक आरोग्याबाबत जितके सजग असतो, तितके दुर्दैवाने मानसिक आरोग्याबाबत असत नाही. सध्याच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या आणि गळेकापू स्पर्धेच्या काळात अनेक लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक लोक सध्या डिप्रेशन, एंग्झायटीसारख्या समस्येत अडकलेले आहेत. मात्र, 'मानसिक विकार' म्हणजे 'वेड लागणे' असा गैरसमज अनेकांचा असल्याने बरेचसे लोक आपल्या समस्येबाबत मोकळेपणाने बोलण्यास किंवा त्याबाबत सल्ला, उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. हल्ली याबाबत बरीचशी जनजागृती झालेली आहे, हे एक सुचिन्हच म्हणावे लागेल. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आजही 40 टक्के भारतीय पुरुष बदनामीच्या भीतीने मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत.

पुरुषांमध्ये आरोग्याविषयीची जागरूकता वाढावी यासाठी दरवर्षी 10 जून ते 16 जून या कालावधीत 'आंतरराष्ट्रीय पुरुष आरोग्य सप्ताह' पाळला जातो. कस्तुरबा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल्स, एमएएचई, मणिपाल येथील मनोचिकित्सा विभागाचे प्रोफेसर व प्रमुख डॉ. समीर कुमार प्रहराज यांनी सांगितले की, अनेक पुरुष मानसिक आरोग्याबाबत कुणाशीही चर्चा करीत नाहीत. कुणाकडून याबाबत मदत मागण्यासही ते संकोच करतात. त्यामुळेच सध्या आत्महत्येच्या घटना वाढत आहेत.

मनोचिकित्सक आणि लिव्हलव्हलाफचे अध्यक्ष डॉ. श्याम भट यांनी सांगितले की, सुमारे 40 टक्के भारतीय पुरुष बदनामीच्या भीतीने आपल्या मानसिक स्थितीबाबत मोकळेपणाने बोलण्यास कचरतात. त्यामध्ये काही चुकीच्या धारणांचाही समावेश आहे. पुरुषांनी आपल्या भावना व्यक्त करू नयेत, आपल्या भावना स्वतःच हाताळाव्यात, अशा धारणांचा यामध्ये समावेश आहे. पुरुष हे शक्ती, मजबुती आणि भावनात्मक स्थैर्याचे प्रतीक असल्याचे जुन्या काळापासूनच बिंबवले जात असते.

टेस्टोस्टेरॉनसारखे हार्मोनल प्रभावही पुरुषांमध्ये वेगवेगळ्या भावनात्मक प्रतिक्रियांमध्ये योगदान देतात. अनेक पुरुष सहसा आपल्या भावना लपवतात. भावना व्यक्त करणे किंवा मदत मागणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे अनेकांना वाटते. त्यामुळे अनेक पुरुष गुपचूप सर्व काही सहन करीत, मनात कुढत राहतात किंवा व्यसनाधीन होतात. या आंतरिक संघर्षातून बाहेर पडण्यासाठी खरे तर योग्य व्यक्तीची, तज्ज्ञाची गरज असते. तसे न घडल्याने अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अडीच पट अधिक आहे. त्यामुळे मानसिक विकारांबाबतचे गैरसमज दूर होणे, कोणत्याही प्रकारची भीती दूर होणे तसेच याबाबत योग्य सल्ला व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. कुटुंबीयांनी तसेच मित्रांनीही अशा व्यक्तीस धीर देणे गरजेचे ठरते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news