थायलंडमध्ये हत्तिणीला झाले चक्क जुळे! | पुढारी

थायलंडमध्ये हत्तिणीला झाले चक्क जुळे!

बँकॉक : हत्तीण एका वेळी एकाच पिल्लास जन्म देत असते. हत्तिणीला जुळे होणे, ही एक अत्यंत दुर्मीळ अशीच घटना आहे. आता मध्य थायलंडमधील एका आशियाई हत्तिणीने चक्क जुळ्या पिल्लांना जन्म देऊन सर्वांना थक्क केले आहे. या 36 वर्षांच्या हत्तिणीचे नाव ‘चामचुरी’ असे आहे.

गेल्या शुक्रवारी ज्यावेळी तिने एका नर पिल्लास जन्म दिला, त्यावेळी अयुथ्या इलेफंट पॅलेस आणि रॉयल क्रालच्या कर्मचार्‍यांना तिची प्रसूती पूर्ण झाली, असेच वाटले होते. याचे कारण म्हणजे ती जुळ्यांना जन्म देईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. ते ज्यावेळी या पिल्लास स्वच्छ करीत होते, त्यावेळीच चामचुरीने दुसर्‍या पिल्लासही जन्म दिला आणि सगळेच आश्चर्यचकित झाले.

हे दुसरे पिल्लू एक मादी आहे. या दुसर्‍या प्रसूतीनंतर हत्तीणही गोंधळली होती व तिच्या पायाखाली हे पिल्लू येऊ नये यासाठी कर्मचार्‍यांना प्रयत्न करावे लागले. या गोंधळात एक कर्मचारी जखमीही झाला. हत्तींच्या बाबतीत जुळ्यांचा जन्म होण्याची शक्यता केवळ एक टक्काच असते. तसेच एका वेळी नर आणि मादी पिल्लांचा जन्म हे तर त्यापेक्षाही दुर्मीळ असल्याचे ‘सेव्ह द इलेफंटस्’ या रिसर्च ऑर्गनायझेशनने म्हटले आहे.

Back to top button