थायरॉईडची समस्या टाळण्यासाठी ‘हे’ टाळावे

थायरॉईडची समस्या टाळण्यासाठी ‘हे’ टाळावे
Published on
Updated on

थायरॉईड ग्रंथी ज्यावेळी पुरेसे हार्मोन उत्सर्जित करीत नाहीत त्यावेळी या स्थितीला 'हायपोथॉयरॉयडिझम' असे म्हटले जाते. यामुळे चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत औषधांचे सेवन करावे लागते. मात्र, आहाराबाबतही काळजी घेतल्यास ही समस्या कमी होण्यास मदत मिळते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. काही पदार्थ टाळले किंवा त्यांचे सेवन कमी प्रमाणात केले, तर ही समस्याही कमी होऊ शकते. संतुलित भोजन, नियमित व्यायाम तसेच स्वतःला हायड्रेट ठेवणे अशा काही उपायांनी ही समस्या हाताळता येऊ शकते. आहारातून हे पदार्थ कमी करावेत…

सोयाबीन : सोयाबीन आणि त्यापासून बनवलेली उत्पादने उदा. टोफू, सोया चाप, सोया मिल्क, सोया सॉस आदींचे सेवन थायरॉईडसाठी दिल्या जाणार्‍या औषधांचा प्रभाव कमी करतात. सोयाबीनमध्ये आयसोफ्लेवोंस नावाचा घटक असतो, जो थायरॉईड ग्रंथीला प्रभावित करू शकतो. अर्थात सोयाबीनचे सेवन कधी तरी केले तरी चालू शकते; पण ते टाळलेले चांगले! विशेषतः ज्यावेळी थायरॉईडची औषधे सुरू असतात त्यावेळी त्याचे सेवन टाळावे.

फ्लॉवर, कोबी : कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रोकोली यासारख्या क्रुसीफेरस भाज्यांमध्ये 'गोइट्रोजन' नावाचा घटक असतो, जो थायरॉईडच्या स्रावाला प्रभावित करतो. जर या भाज्या कच्च्या खाल्ल्या तर हायपोथॉयरॉईडिझमची समस्या आणखी वाढू शकते. गोइट्रोजन आयोडिनचे शोषण करण्याची क्षमताही कमी करते जे थायरॉईडच्या स्रावासाठी अतिशय गरजेचे असते. या भाज्या शिजवल्यावर गोइट्रोजनचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे अशा भाज्या कमी प्रमाणात तसेच नीट शिजवून खाणे चांगले!

गहू, बार्ली, राई : गहू, बार्ली (सातू) आणि राईमध्ये ग्लुटेन नावाचे प्रोटीन असते. हायपोथॉयरॉईडिझमने ग्रस्त अशा काही लोकांना त्याची समस्या असू शकते. विशेषतः ज्यांना हाशिमोटो थायरॉयडिटिस आहे त्यांना ही समस्या असते. हा हायपोथॉयरॉईडिझमचा एक ऑटोइम्युन प्रकार आहे. ग्लुटेन हे इंफ्लेमेशन (सूज) वाढवू शकते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी करू शकते व त्यामुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते. भोजनातून ग्लुटेनयुक्त पदार्थ घटवल्यास रुग्णांना लाभ मिळू शकतो.

प्रोसेस्ड फूड : प्रक्रिया केलेल्या अन्नात नुकसानदायक फॅट, शुगर किंवा एडिटिव्हज मोठ्या प्रमाणात असतात, जे वजन आणि इंफ्लेमेशन वाढवू शकतात. हायपोथॉयरॉयडिझममध्ये वजन नियंत्रित करणे अतिशय कठीण असते. याचे कारण म्हणजे चयापचय क्रिया मंदावलेली असते. प्रोसेस्ड फूडमध्ये सोडियम अधिक असते जे थायरॉईडचे संतुलन बिघडवू शकते. अशावेळी अखंड धान्य व अनप्रोसेस्ड फूडचे सेवन लाभदायक ठरते.

कॉफी : कॉफीचे सेवन थायरॉईडच्या औषधांचा प्रभाव कमी करते. त्यामुळे कॉफी पिल्यानंतर एक तासानंतरच औषधे घेणे हितावह ठरते. याशिवाय कॅफीन हे एड्रिनल ग्रंथीला अधिक सक्रिय करू शकते, त्यामुळे थकवा वाढतो. हे हायपोथॉयरॉयडिझमचे एक सामान्य लक्षण आहे. दिवसभरात घेतली जाणारी कॅफीनची मात्राही नियंत्रित करावी. कॅफीनमुळे थायरॉईड ग्रंथीचेही नुकसान होऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news