माया संस्कृतीत देत होते कोवळ्या मुलांचा बळी

माया संस्कृतीत देत होते कोवळ्या मुलांचा बळी

वॉशिंग्टन : रहस्यमय माया संस्कृतीमध्ये लहान मुलांचा बळी दिला जात असे. यापूर्वी बळी दिलेल्या व्यक्तींचे अवशेष सापडले होते; पण त्यांची लिंगनिश्चिती होत नव्हती. बळी गेलेल्या व्यक्ती मुली असाव्यात असे मानले जात होते. मात्र, आता डीएनए विश्लेषणातून दिसून आले आहे की, माया संस्कृतीमध्ये लहान मुलांचा बळी दिला जात होता. त्यामध्ये तीन वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. बहुतांश मुलं ही तीन ते सहा वर्षे वयोगटांतील आहेत. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशनरी अँथ्राेपोलॉजीच्या संशोधकांनी प्राचीन डीएनएची तपासणी करून याबाबतचा दावा केला आहे.

चुल्टुन नावाच्या एका भूमिगत कक्षामध्ये तब्बल शंभर व्यक्तींचे अवशेष सापडले होते. त्यापैकी 64 व्यक्तींच्या अवशेषांच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले की, हे सर्व अवशेष लहान मुलांचे आहेत. बहुतांश मुलं एकमेकांची नातेवाईक होती आणि त्यामध्ये दोन जुळे भाऊही होते. तरुण मुलींचा माया संस्कृतीमध्ये बळी दिला जात असे, या प्रचलित धारणेला छेद देणारे हे नवे संशोधन आहे. या नव्या संशोधनामुळे मेक्सिकोच्या युकाटन बेटावरील चिचेन इटजामधील मुलांच्या बळीच्या प्रथेची माहिती समोर आली आहे.

सेंट्रो आयएनएएच युकाटनचे आर्कियोलॉजिस्ट ओना डेल कॅस्टिलो-चावेज यांनी सांगितले की, ही लहान मुलं पाचशेपेक्षा अधिक वर्षे एकाच जागी दफन होती. बळी दिलेल्या मुलांची निवड विशिष्ट प्रकारे करण्यात आली होती. चुल्टुनमध्ये लहान वयाच्या व्यक्तींचा बळी दिला जात असे, याची माहिती 1967 मध्येच संशोधनामध्ये मिळाली होती. एका कक्षात शंभरपेक्षा अधिक मुलांचे अवशेष मिळाले होते. मात्र, केवळ हाडांवरून या व्यक्तींची लिंगनिश्चिती होत नव्हती. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वैज्ञानिकांनी प्राचीन डीएनएचा अभ्यास करून नवे संशोधन केले. इम्युनोजेनेटिक्स एक्सपर्ट रोड्रिगो बारक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने हे संशोधन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news