पृथ्वीजवळून गेला 427 मीटरचा लघुग्रह

पृथ्वीजवळून गेला 427 मीटरचा लघुग्रह

वॉशिंग्टन : पृथ्वीजवळून वेळोवेळी अनेक लघुग्रह जात असतात. आता 'नासा'ने म्हटले आहे की, मंगळवारीही पृथ्वीजवळून एक लघुग्रह गेला. या लघुग्रहाचे नाव '2024 सीआर29' असे होते. हा लघुग्रह 427 मीटर आकाराचा होता. तो ताशी 26,562 किलोमीटर या वेगाने पृथ्वीजवळून गेला.

हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 73.7 लाख किलोमीटर अंतरावरून पुढे गेला. त्यामुळे अर्थातच त्याची पृथ्वीला धडक होण्याची शक्यता नव्हती. हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतराच्या 19 पट अधिक आहे. अर्थात, ते जास्त वाटत असले तरी खगोलीय द़ृष्टिकोनातून पाहिल्यावर हे अंतर अधिक नाही. त्यामुळे खगोलशास्त्रज्ञांची नजर अशा प्रत्येक लघुग्रहांवर असते. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेनंतर पृथ्वीवरून डायनासोर व अन्य अनेक प्रजाती नष्ट झाल्या होत्या. मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांदरम्यान अशा लघुग्रहांचा एक पट्टाच असून, त्याला 'अस्टेरॉईड बेल्ट' असे नाव आहे.

संशोधकांच्या मते, पृथ्वीला एखादा लघुग्रह धडकण्यासारखी घटना अत्यंत दुर्मीळ असते. सुमारे 1.66 लाख वर्षांमध्ये एकदा असेच तिचे प्रमाण आहे. जर मंगळवारी पृथ्वीजवळून गेलेला लघुग्रह पृथ्वीला धडकला असता, तर पृथ्वीवर 1363 फूट खोल आणि 3.2 किलोमीटर रुंदीचा खड्डा बनला असता. तसेच ही धडक ज्या ठिकाणी होईल त्याच्या 130 किलोमीटर परिघातील झाडे जळून गेली असतील. तसेच या धडकेने 239 डीबीच्या शॉकवेव्ह निघाल्या असत्या, ज्यामुळे 29 किलोमीटरच्या परिघातील इमारती कोसळल्या असत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news