‘जेम्स वेब’कडून ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या काळातील कार्बनचा छडा

‘जेम्स वेब’कडून ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या काळातील कार्बनचा छडा

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आता ब्रह्मांडाच्या पहाटेच्या काळात जीवसृष्टीसाठीच्या मूलभूत घटकाचा छडा लावला आहे. ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या काळातील पहिल्यावहिल्या आकाशगंगांचे निरीक्षण करीत असतानाच या अंतराळ दुर्बिणीने कार्बनचा छडा लावला. ज्या आकाशगंगेत कार्बन आढळले ती 'बिग बँग' नंतर अवघ्या 350 दशलक्ष वर्षांनंतर बनली होती. 'बिग बँग' या नावाने ओळखल्या जाणार्‍या महाविस्फोटानंतरच ब्रह्मांडाची निर्मिती झाली, असे मानले जाते. या संशोधनावरून हे दिसून आले की, जीवसृष्टीचा प्रारंभही आधीच्या अनुमानापेक्षा पुष्कळच लवकर सुरू झाला. त्यामुळे याबाबतच्या सध्याच्या प्रचलित धारणा बदलणार आहेत.

या दूरस्थ आणि छोट्या आकाशगंगेत कार्बनचा ढग आढळला आहे. ब्रह्मांडातील हायड्रोजनखेरीज आणखी एका प्रारंभिक मूलद्रव्याचा यानिमित्ताने शोध लागला आहे. 'अ‍ॅस्टॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी स्वीकारली गेली आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे संशोधक रॉबर्टो मैओलिनो यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी सांगितले, यापूर्वीच्या संशोधनांमधून असे दिसले होते की, कार्बनची मोठ्या प्रमाणात निर्मिती फार उशिरा सुरू झाली.

ती 'बिग बँग' नंतर तब्बल एक अब्ज वर्षांनंतर सुरू झाल्याची प्रचलित धारणा होती; मात्र आता आम्हाला आढळले की, कार्बनची निर्मिती बरीच आधी झाली आहे. कदाचित कार्बन हा जगातील सर्वात जुना धातूही ठरू शकतो. हायड्रोजन आणि हेलियमपेक्षा जड असलेल्या मूलद्रव्यांचे वर्गीकरण 'धातू'मध्ये करण्यात येत असते. 'जीएस-झेड12' या आकाशगंगेच्या निरीक्षणावेळी जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीला हा कार्बनचा ढग आढळला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news