![चोरी करायला आला आणि एसीत डाराडूर झोपला!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-84.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लखनौ : सध्या संपूर्ण देशभरात भयंकर उकाडा आहे. विशेषतः, उत्तर भारतातील तापमान कमालीचे वाढले आहे. कडक उन्हाळ्याचा फटका चोरांनाही बसला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका घरात चोरीची अनोखी घटना घडली आहे. चोर चोरी करण्यासाठी घरात तर घुसला; मात्र उकाड्याने तो इतका हैराण झाला होता की, खोलीत असलेल्या एसीच्या थंड हवेमुळे तो चोरी करायलाच विसरला आणि त्याला तिथेच गाढ झोप लागली. तो झोपेतून उठला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली!
इंदिरानगर येथील सेक्टर 20 मधील ही घटना आहे. इंदिरानगर परिसरात डॉक्टर सुनील पांडे नावाचे एक व्यक्ती राहतात. जेव्हा घटना घडली तेव्हा त्यांच्या घरात कोणीच नव्हते. सुनील पांडे वाराणसी येथे प्रॅक्टिस करतात. सुनील पांडे घरात नसताना चोर चोरी करण्यासाठी घरी आला. घरात घुसल्यानंतर तो हॉलमध्ये पोहोचला. तेव्हा त्याचे लक्ष हॉलमध्ये असलेल्या एसीकडे गेले. तेव्हा चोराने एसी लावला आणि तिथेच जमिनीवर झोपला.
त्याला इतकी गाढ झोप लागली की, त्याला कळलंच नाही की, तो चोरी करण्यासाठी आला होता. शेजार्यांना घराचे गेट खुले दिसले तेव्हा त्यांनी डॉक्टर सुनील यांना फोन केला. या फोननंतर डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. घरात पोहोचताच त्यांना चोर घरात एसीमध्ये झोपलेला आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला उठवून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.