पंखांसहित ‘ड्रीम चेसर’ अवकाश विमान उड्डाणासाठी सज्ज

पंखांसहित ‘ड्रीम चेसर’ अवकाश विमान उड्डाणासाठी सज्ज

वॉशिंग्टन : सारे काही सध्याच्या नियोजनानुसार झाल्यास अमेरिकेतील कॅनव्हरेल स्पेस फोर्स स्टेशनवरून युनायटेड लाँच अलायन्स वल्कन रॉकेटच्या माध्यमातून जगातील पहिलेवहिले पंखांसहित व्यावसायिक अंतराळ विमान अंतराळाकडील आपल्या पहिल्या प्रवासासाठी झेपावणार आहे. स्पेस कंपनीच्या या विमानाला टेनासिटी ड्रीम चेसर असे नाव दिले गेले आहे. आपल्या नावाला साजेशी अशी या विमानाची मोहीम असणार आहे आणि पारंपरिक विमानाप्रमाणे रनवेवर लँडिंग करण्याची त्याची क्षमता असेल. सध्या याचा वापर कार्गोसाठी केला जाणार आहे.

या विमानाचा वापर अंतराळ पर्यटन आणि महत्त्वपूर्ण अंतराळ मोहिमांसाठी केला जाणार आहे. सध्या मात्र यातून पर्यटकांना अंतराळात नेले जाणार नाही. सिएरा स्पेस नासाच्या संयुक्त अभियानात या विमानाचा वापर इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर सामान पोहोचवण्यासाठी केला जाणार आहे. या विमानातून एकावेळी 7800 पौंड भोजन, पाणी व अन्य साहित्य पोहोचवले जाऊ शकते. हे विमान एकावेळी 45 दिवसांपर्यंत इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर थांबेल, असे सध्या सांगण्यात आले आहे.

प्रत्यक्ष वापरात आणले जाण्यापूर्वी नासाने या विमानाची प्रायोगिक चाचणी घेतली असून त्यात उष्णता, कडाक्याची थंडी आणि प्रचंड वेगाची कंपने यात त्या विमानाची स्थिती कशी राहते, यावर भर दिला गेला आहे. सिएरा स्पेसने 2 वर्षांपूर्वी या विमानाची योजना सादर केली होती. आता नासासह हा करार पूर्णत्वास नेण्याची पूर्ण तयारी झाली आहे. सध्या हे विमान फ्लोरिडातील नासा केनेडी स्पेस सेंटरमध्ये असून आणखी काही चाचण्यानंतर त्याच्या उड्डाणाला हिरवा कंदील दर्शवला जाईल, असे सध्याचे संकेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news