जिबुती देशात सोडले प्रयोगशाळेत विकसित केलेले डास

जिबुती देशात सोडले प्रयोगशाळेत विकसित केलेले डास

लंडन : जगातील सर्वात चिंताजनक आजारांमध्ये मलेरियाचा समावेश होतो. विशेषतः आफ्रिका खंडात मलेरियाचा कहर मोठाच आहे. मलेरिया नियंत्रणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. आता आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असलेल्या जिबुती या छोट्याशा देशात जनुकीय बदल केलेले म्हणजे जेनेटिकली मॉडीफाईड (जीएमओ) डासांना वातावरणात सोडण्यात आले आहे. असे करण्यामागचा उद्देश मलेरिया पसरवणार्‍या डासांच्या एक जातीला प्रतिबंध करणे हा आहे.

वातावरणात सोडण्यात आलेल्या खास डासांना 'एनोफेलीज स्टीफेन्सी डास' म्हणतात. हे डास चावत नाहीत. इंग्लंडच्या ऑक्सीटेक या बायो टेक्नॉलॉजी कंपनीने हे डास विकसित केले आहेत. या डासांमध्ये एक विशिष्ट जनुक (जीन) असतो. मादी डासांना प्रौढ होण्याआधीच हा जनुक संपवून टाकतो. प्रत्यक्षात फक्त मादी डासच आणि विषाणूमुळे होणार्‍या मरेलियासारख्या इतर आजारांचा फैलाव करतात. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डासांना मोकळ्या हवेत सोडण्याची ही पूर्व आफ्रिकेतील पहिलीच वेळ आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात असे दुसर्‍यांदा करण्यात आले आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्श (सीडीसी) या संस्थेचं म्हणणं आहे की, या पद्धतीचा वापर ब-ाझिल, केमेन बेटं, पनामा आणि भारतात करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे ही पद्धत खूपच यशस्वी ठरली होती.

सीडीसीचे म्हणणे आहे की, 2019 नंतर संपूर्ण जगभरात एक अब्जपेक्षा जास्त जेनेटिकली मॉडिफाईड डासांना खुल्या वातावरणात सोडण्यात आले आहे. या डासांची पहिली खेप गुरुवारी जिबुतीमधील अम्बोउली उपनगरांमध्ये खुल्या हवेत सोडण्यात आली होती. ऑक्सिटेक लिमिटेड, जिबुती सरकार आणि असोसिएशन म्युचुआलिस या स्वयंसेवी संघटनेद्वारे संयुक्तरित्या ही योजना राबविण्यात येते आहे. ऑक्सिटेकचे प्रमुख ग्रे फ्रेंडसेन यांनी सांगितले की, 'आम्ही चांगले डास बनवले आहेत. ते चावत नाही. ते रोग पसरवत नाहीत. जेव्हा या डासांना खुल्या हवेत सोडले जाते तेव्हा हे डास जंगली डासांच्या जातीतील मादी डासांशी प्रजनन करण्याचा प्रयत्न करतात.

प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या डासांमध्ये लोकसंख्या नियंत्रित करणारा एक जनुक असतो. हा जनुक मादी डासांच्या पिल्लांची वाढ प्रजननाच्या वयापर्यत होऊ देत नाही. या योजनेमध्ये काम करणार्‍या वैज्ञानिकाचे म्हणणे आहे की, जंगली डास आणि प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डासांच्या प्रजननातून जन्माला आलेल्या डासांमध्ये फक्त नर डासच जिवंत राहतात आणि शेवटी ते देखील मरतात. 2018 मध्ये बर्किना फासोमध्ये नपुंसक एनोफेलीज कॉल्युजी डासांना खुल्या हवेत सोडण्यात आले होते. त्यांच्या उलट नवे एनोफेलीज स्टीफेन्सी डास नव्या पिढीला जन्म देऊ शकतात. प्रयोगशाळेत तयार झालेल्या डासांना खुल्या हवेत सोडण्याची ही योजना जिबुती फ्रेंडली डास योजनेचा एक भाग आहे. याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली होती.

एनोफेलीज स्टीफेन्सी डासांच्या जातीचा फैलाव थांबवणं हे या या योजनेचं उद्दिष्ट आहे. माणसांना चावणार्‍या डासांच्या या जातीचा शोध 2012 मध्ये जिबुतीमध्ये लावण्यात आला होता. त्यावेळेस जिबुतीत मलेरिया मुळापासून संपण्याच्या मार्गावर होता. त्यावेळेस या देशात मलेरियाचे 30 रुग्ण आढळले होते. तेव्हापासून जिबुतीमध्ये मलेरियाचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. 2020 पर्यत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 73 हजारांवर पोचली होती. डासांची ही जात आता आफ्रिका खंडातील इथिओपिया, सोमालिया, केनिया, सुदान, नायजेरिया आणि घाना या देशांमध्ये देखील आढळते. एनोफेलीज स्टीफेन्सी जातीचे डासांच मूळ आशिया खंडात आहे. या डासांवर नियंत्रण मिळवू खूप कठीण असते. या डासांना शहरी डास असेदेखील म्हटले जाते. डासांवर नियंत्रण मिळवण्याच्या पारंपरिक पद्धतींवर मात करण्यात या डासांना यश आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news