सहा वर्षांचा ‘गुगल बॉय’ देतो दोन हजार प्रश्नांची उत्तरे
नागपूर : अनिशचे वय सहा वर्षे आहे. तो अवघ्या 2 वर्षांचा होता, तेव्हा नागपूरला आजीकडे राहायला आला होता. अनिशचे वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्ताने शहर बदलावे लागतं असल्यामुळे अनिशची आई कल्याणी खेडकर काही काळासाठी आईकडे नागपूरला राहायला आल्या. आता नागपूरमध्ये हा मुलगा 'गुगल बॉय' म्हणून प्रसिद्ध झाला आहे. अवघ्या सहा वर्षांचा अनिश दोन हजार प्रश्नांची उत्तरे देतो!
अनिश अगदी लहानपणापासून अंतराळसंबंधीच्या चित्रांमध्ये रमायचा. अवघ्या दोन वर्षांचा अबोल बालकाची अंतराळाविषयीची रूची थक्क करणारी होती. सहा वर्षांचा बालक म्हटलं की त्याचे बोबडे बोल, त्याच खेळणं आणि मस्ती या सगळ्यांना आनंद देतात; मात्र नागपुरात हा असा चिमुकला आहे, ज्याला आता 'गुगल बॉय'च म्हटले जाते! अनिश अनुपम खेडकर या चिमुकल्याने स्पेस सायन्स, रॉकेट, जेट फ्लाईट, हेलिकॉप्टर, जगातील अनेक देशांचे चलनासह अनेक विषयांचे सखोल ज्ञान अर्जित केले आहे.
अनिशची अनेक विषयावरील दोन हजार प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ झाली आहेत. अनिशला अंतरिक्ष आणि अंतराळवीरांच्या बाबतीत सर्वाधिक रुची आहे. त्यामुळे त्याला स्पेसच्या संदर्भातील पाचशे (फॅक्टस्) तथ्यं माहिती आहेत. अनिश नेत्रदीपक यशामागे त्याची आजी स्मिता पंडित यांचे विशेष योगदान आहे. स्मिता पंडित यांनी कर्करोगाशी लढत असतानाच अनिशवर केलेल्या संस्कारामुळे तो आज अवघ्या सहाव्या वर्षी 'गुगल बॉय' म्हणून नावारूपाला येत आहे.