डार्क मॅटर, डार्क एनर्जीवर आता होणार अधिक संशोधन

डार्क मॅटर, डार्क एनर्जीवर आता होणार अधिक संशोधन
Published on
Updated on

वॉशिंग्टन : ब्रह्मांडातील सर्वात रहस्यमय घटकांमध्ये डार्क मॅटर व डार्क एनर्जी या दोन घटकांचा समावेश होतो. याबाबत विज्ञानाला अत्यंत कमी माहिती आहे. आता युरोपियन स्पेस एजन्सी युक्लिड स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने या दोन घटकांचा शोध घेऊन त्याबाबत अधिक संशोधन करणार आहे. 'इसा'ची ही सहा वर्षांची महत्त्वाकांक्षी मोहीम असून, त्यामधून याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.

1 जुलै 2023 मध्ये अमेरिकेच्या फ्लोरिडातील केप कॅनाव्हरल येथून युक्लिड स्पेस टेलिस्कोपचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. तिचा उद्देश ब्रह्मांडात व्यापून असलेल्या डार्क मॅटर व डार्क एनर्जीबाबत संशोधन करणे हा आहे. ब्रह्मांडाचा 95 टक्के भाग डार्क मॅटर व डार्क एनर्जीनेच व्यापलेला असला, तरी त्याबाबत अत्यंत कमी माहिती विज्ञानाला आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा थेटपणे छडा लावता येत नाही. मात्र, अंतराळातील अनेक आकाशगंगांमध्ये गुरुत्वाकर्षणाला विकृत करणारा त्यांचा प्रभाव पाहायला मिळतो. युक्लिड दुर्बिणीमध्ये सुक्ष्म गोष्टींचा छडा लावण्याचीही मोठी क्षमता आहे. तसेच मोठ्या क्षेत्रावर ही दुर्बीण लक्ष ठेवू शकते. त्यामुळे तिच्या सहाय्याने या घटकांचा छडा लावता येईल, असे संशोधकांना वाटते.

या दुर्बिणीला प्राचीन ग्रीक गणितज्ज्ञ युक्लिड यांचे नाव देण्यात आले आहे. ही दुर्बीण 14.7 फूट उंच आणि 10.2 फूट व्यासाची आहे. या दुर्बिणीमध्ये दोन उपकरणे आहेत. त्यामध्ये निअर-इन्फ्रारेड कॅमेरा असून तो आकाशगंगांमधील अंतर व चमक मोजेल तसेच एक व्हिजिबल-लाईट कॅमेराही आहे जो त्यांच्या आकाराचा अभ्यास करील. ही दुर्बीण भूतकाळात दहा अब्ज वर्षांपूर्वीच्या घटनांमध्येही डोकावू शकते. तिची ही क्षमता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या तुलनेत किंचितच कमी आहे. जेम्स वेब 13 अब्ज वर्षांपूर्वीच्या खगोलांचा किंवा अशाकाशगंगांचाही छडा लावू शकते. 23 मे 2024 या दिवशी 'इसा'ने 'युक्लिड'कडून पहिल्या चोवीस तासांमध्ये टिपलेल्या पाच प्रतिमा शेअर केल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news