अमेरिकन संशोधकांनी बनवल्या गर्भनिरोधक अँटिबॉडी | पुढारी

अमेरिकन संशोधकांनी बनवल्या गर्भनिरोधक अँटिबॉडी

वॉशिंग्टन : गर्भनिरोधक अँटिबॉडी अमेरिकन संशोधकांनी विकसित केल्या आहेत. त्या शुक्राणूला कमजोर करतात व यामुळे जन्म दराला नियंत्रित केले जाऊ शकते. बोस्टन युनिव्हर्सिटी आणि सॅन दियागोमधील ‘जॅबबायो’ या कंपनीने एकत्रितपणे अशा अँटिबॉडी बनवल्या आहेत. संशोधकांनी त्यांना ‘ह्यूमन कॉन्ट्रासेप्शन अँटिबॉडी’ असे नाव दिले आहे.

या नव्या गर्भनिरोधक अँटिबॉडीचा माणसाच्या वेगवेगळ्या गुणवत्तेच्या शुक्राणूंवर चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. ही अँटिबॉडी अवघ्या पंधरा सेकंदांमध्येच शुक्राणूला कमजोर करून त्याला निष्क्रिय करते असे दिसून आले.

बोस्टन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक देबोरह अँडरसन यांनी सांगितले की या गर्भनिरोधक अँटिबॉडी इच्छुक महिलेच्या देहात सोडल्या जातात. त्यापासून संबंधित महिलेस कोणताही त्रास होत नाही. सध्या या अँटिबॉडीच्या मानवावरील पहिल्या टप्प्यातील चाचण्या केल्या जातआहेत.

या अँटिबॉडीजचा वापर लैंगिक संबंधातून फैलावणार्‍या आजारांना रोखण्यासाठीही केला जाऊ शकतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

Back to top button