बीजिंग : आपल्याकडे अनेक वर्षांपूर्वी 'अवतार' नावाचा चित्रपट येऊन गेला होता. त्यामध्ये राजेश खन्ना, शबाना आझमी आणि सचिन पिळगावकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. वृद्धावस्थेत मुलांनी वार्यावर सोडले असताना नोकर काळजी घेतो आणि नव्याने आयुष्याची उभारणी करण्यासाठी मदत करतो असे त्यामध्ये कथानक होते. राजेश खन्ना आपली सर्व संपत्ती नोकर बनलेल्या सचिनच्या नावावर करतो. हे केवळ चित्रपटांमध्येच घडते असे नाही. जगातील अनेक श्रीमंतांनी आपली संपत्ती नातेवाईक किंवा मुलांऐवजी इतरांच्या नावावर केलेली आहे. त्यामध्ये अगदी नोकरांपासून पाळीव पशू-पक्ष्यांपर्यंत अनेकांचा समावेश होतो. आताही चीनमध्ये एका आजोबांनी आपली कोट्यवधी रुपयांची संपत्ती आपल्या कुटुंबीयांच्या ऐवजी नोकराच्या नावे केली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे आजोबा राजधानी बीजिंग येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना यावर विश्वास ठेवणही कठीण जातंय. रुआन असे आडनाव या वृद्धाचे आहे. रुआन यांचा 1930 रोजी जन्म झाला होता. त्यांनी कधीच लग्न नव्हते केले. तसेच त्यांनी कधी मूलही दत्तक घेतले नाही. त्यांच्या आई-वडिलांचेही कमी वयातच निधन झाले होते. अशावेळी ते पूर्णपणे एकटे पडले होते. 2011 साली त्यांनी त्यांच्याच गावातील एका मुलाला बोलवले. त्याचे नाव लियू असे होते. लियू त्यांच्या जवळच राहून त्यांची सेवा करत होता. त्यांना काही हवं-नको ते सगळं काळजीने करायचा. रुआन यांच्या मृत्यूपर्यंत तो त्यांच्या सोबत राहिला. त्यांची खूप काळजी घेतली. त्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आला होता.
रुआन यांची लियू खूप काळजी घ्यायचा. त्याची ती काळजी व स्वभाव बघून रुआन यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती त्याच्या नावे केली. त्यांनी 800 स्क्वेअर मीटरचे घर तोडून त्याजागी एक मोठी इमारत उभारली. त्यातील 5 फ्लॅटस् लियूच्या नावावर करण्यात आले. या 4 फ्लॅटस्ची किंमत कोटी रुपयांमध्ये आहेत. जेव्हा रुआन यांच्या कुटुंबीयांना म्हणजेच पुतणे व भाच्यांना कळले तेव्हा त्यांनी रुआन यांच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं. मात्र रुआन यांचे मृत्युपत्र पाहून कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली व नोकराच्या पक्षात निर्णय दिला. नोकर कोटींच्या संपत्तीचा मालक झाला.