डंबेलच्या आकाराचा दिसला नेब्युला | पुढारी

डंबेलच्या आकाराचा दिसला नेब्युला

वॉशिंग्टन : अंतराळात अनेक अनोख्या रचना पाहायला मिळत असतात. त्यापैकी एक चमकदार आणि वैशिष्ट्यपूर्ण खगोलीय रचना म्हणजे ‘नेब्युला.’ हे नेब्युला अनेक आकाराचे असतात. कधी ते डोळ्यांसारखे दिसतात, तर कधी एखाद्या पशू किंवा पक्ष्यासारखे. आता हबल स्पेस टेलिस्कोपने एका अशाच नेब्युलाचे छायाचित्र टिपले आहे. हा नेब्युला व्यायाम करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या एखाद्या डंबेलसारख्या आकाराचा आहे.

‘नेब्युला’ म्हणजे मृत होत असलेल्या तार्‍याचे अवशेष. या तार्‍यामधून वायू, धूळ व अन्य सामग्रीचे उत्सर्जन होत असते. या नव्या नेब्युलाचे छायाचित्र ‘हबल’ला 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘नासा’ने जारी केले आहे. वैज्ञानिकांनी या नेब्युलाचे नाव ‘कॉस्मिक डंबेल’ असे ठेवले आहे. त्याला ‘मेसिएर 76’ किंवा ‘एम 76’ असे वास्तविक नाव आहे. हा नेब्युला पृथ्वीपासून 3,400 प्रकाशवर्ष अंतरावरील ‘पर्सेअस’ तारामंडळात आहे.

‘हबल’ने टिपलेल्या या छायाचित्रात मृत होत असलेल्या लाल, विशाल तार्‍यामधून बाहेर पडत असलेल्या वायूचा फुगा दिसून येतो. हा लाल तारा हळूहळू सफेद खुजा तारा बनत चालला आहे. या तार्‍याने त्याच्याभोवती फिरणार्‍या एका अन्य तार्‍याला गिळंकृत केले होते. हे छायाचित्र एका विशेष दिवसाचे निमित्त साधून प्रसिद्ध करण्यात आले. 24 एप्रिल 1990 मध्ये ‘हबल स्पेस टेलिस्कोप’ लाँच करण्यात आली होती. आता या अंतराळ दुर्बिणीने सेवेची 34 वर्षे पूर्ण केली आहेत.

Back to top button