डुकराची किडनी, मेकॅनिकल पंपने वाचले महिलेचे प्राण | पुढारी

डुकराची किडनी, मेकॅनिकल पंपने वाचले महिलेचे प्राण

न्यू जर्सी : अमेरिकेतील डॉक्टरांनी एका महिलेच्या शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण केले आहे. हे प्रत्यारोपण दोन शस्त्रक्रियांचा एक हिस्सा होता, ज्यामुळे रुग्ण महिलेचे प्राण वाचले. लिसा पिसानो नावाच्या या महिलेचे हृदय आणि किडनी एकाचवेळी खराब झाले होते. त्यामुळे तिच्यावर प्रचलित प्रत्यारोपण होऊ शकणार नव्हते. अशावेळी डॉक्टरांनी एक अनोखा मार्ग शोधला. त्यांनी हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी एक मेकॅनिकल पंप लावला आणि काही दिवसांनी जनुकीय सुधारणा केलेली डुकराची किडनी या महिलेमध्ये प्रत्यारोपित केली.

एनवाययू लँगोन हेल्थच्या डॉक्टरांनी हे प्रत्यारोपण केले आहे. आता या महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. 54 वर्षांच्या पिसानो यांनी एका वॉकरच्या सहाय्याने काही पावले चालूनही दाखवले. पिसानो या अशा दुसर्‍या रुग्ण आहेत ज्यांच्या शरीरात डुकराची किडनी प्रत्यारोपित केली आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये एका रुग्णामध्ये प्रथमच डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते.

पिसानो यांनी सांगितले की, मी मृत्यूच्या जवळ जाऊन पोहोचले होते व अशावेळी मी एक चान्स घेतला! जर हे प्रत्यारोपण माझ्याबाबत काम केले नसते तर ते दुसर्‍या कुणाबाबत तरी काम केलेच असते व त्याला ही मदत मिळाली असती. एनवाययू लँगोन ट्रान्सप्लँट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. रॉबर्ट मोंटगोमरी यांनी सांगितले की, या किडनीने आपले कामही सुरू केले आहे. एका रिपोर्टनुसार, यूएस ट्रांसप्लांट वेटिंग लिस्टमध्ये एक लाखापेक्षाही अधिक लोक किडनी प्रत्यारोपणाची वाट पाहत आहेत.

हजारो लोक वाट पाहतच मृत्युमुखी पडत असतात. अवयवदान कमी होत असल्याने अशा लोकांना प्रत्यारोपणासाठी मानवी किडनी मिळू शकत नाही. अशावेळी अनेक बायोटेक कंपन्या आता डुकरांच्या शरीरातील अवयव जेनेटिकली मॉडिफाईड करून ते प्रत्यारोपणासाठी उपलब्ध करून देत आहेत. यापूर्वी एका ब्रेन डेड माणसाच्या शरीरात डुकराची किडनी आणि हृदयही प्रत्यारोपित करण्यात आले होते. या प्रयोगाचेही निष्कर्ष चांगले होते.

Back to top button