न्यूयॉर्क : मेट गाला प्रसिद्ध कलाकार, फॅशन व पॉप संस्कृतीच्या दृष्टीने बड्या इव्हेंटसपैकी एक आहे. देशविदेशातील सिलेब्रिटी या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकतेने प्रतीक्षा करत असतात. याच मेट गालाच्या यंदाची थीम जाहीर केल्यानंतर त्याचे बरेच ट्रोलिंग केले जात आहे. युरोपची बजेट एअरलाईन रॅनएअरने सोशल मीडियावर मेट गालाच्या 2024 च्या थीमवर मजेदार प्रतिक्रिया देताना खळबळ उडवून दिली आहे. एअरलाईन्सने यावेळी विमानाची बदललेली एक इमेज सोशल मीडियावर शेअर केली आहे.
रॅनएअर या एअरलाईन्सकडून नेहमी आपल्या ह्यूमर व विनोदी पोस्ट केले जातात आणि यंदा त्यांनी मेट गालाला लक्ष्य केले आहे. यंदा या इव्हेंटची द गार्डन ऑफ टाईम ही थिम असेल, असे जाहीर केले गेले आणि त्यानंतर या एअरलाई्न्सने त्याची टर्र उडवत फुलाफळाने सजवलेल्या व गुलाबी लिपस्टीकमधील विमानाचा एक फोटो शेअर केला आहे.
रॅनएअरने हा फोटो शेअर करताना त्याखाली 'बॉर्न टू स्ले, फोर्स्ड टू फ्लाय' असे नमूद केले आहे. एक्स अर्थात, पूर्वाश्रमीच्या ट्वीटर प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट बरीच व्हायरल होत असून त्याला 4 कोटी 18 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत.
कमेंटसमध्ये नेटिझन्सनी या फॅशन परेडची बरीच खिल्ली उडवली. यापैकी एक युजर म्हणाला, 'या विमानाची लँडिंग लोकांना मारुनच टाकेल'. आणखी एका युजरने तर कहरच केला. तो म्हणाला, 'एकाच सिलेब्रिटीला वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये पाहण्यापेक्षा मी हे सजवलेले विमान पाहणे अधिक पसंत करेन'!